प्रशांत देशमुख

समाज माध्यमावर सूत जुळलेल्या मुलीला फ सवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ती कशीबशी मुंबईतून पळ काढत गावी परतली. मात्र गर्भवती असल्याने तिचा स्वीकार करण्याचा पेच पडलेल्या पालकांची यातून सुटका करीत एका स्वयंसेवी महिलेने स्वत:चे नाव बाळाला देण्याची हमी देत एक नवा जीव सन्मानाने सृष्टीत आणलाच, शिवाय मुलीचे व पालकाचेही नाते घट्ट केले.

मन पिळवटून टाकणारी ही कथा मानवतेचे विविध पैलू उलगडणारी ठरली. समाजमाध्यमातून युवा पिढीची फसवणूक नेहमीच चर्चेत असते. परंतु तिचा शेवट सुखद होईलच असे नाही. या कथेचा अंत काहीसा सुखद व माणुसकीला वेगळय़ाच उंचीवर नेणारा ठरावा. पुलगावच्या महाविद्यालयात पदवीच्या विज्ञान शाखेतील प्रथम वर्षांतील एका साधारण कुटुंबातील मुलीची इस्टाग्रामद्वारे मुंबईच्या एका मुलाशी ओळख झाली. वाढत्या संपर्कातून ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. शेवटी गेल्यावर्षी ती मुलगी ४ ऑक्टोबरला कथित प्रियकराच्या प्रेमाखातर घरून पळून गेली. तेव्हा मोबाईल तिने घरीच ठेवला. आई-वडिलांसह सर्वानी सर्वत्र शोधाशोध केली. परंतु थांगपत्ता न लागल्याने शेवटी वडिलांनी पुलगाव पोलिसांत तक्रार केली. अखेर सात महिन्यानंतर करोना कोंडीत ती कशीबशी देवळीला पोहोचली. पोलिसांनी वडिलांना निरोप देत बोलावून घेतले. मुलगी सापडल्याचा हर्षवायू झालेल्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले. मात्र तिला पाहताच ते स्तब्ध झाले. मुलगी मुंबईतून आल्याचे सांगते पण इतर काही बोलायला तयार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

वडिलांनी तिचा ताबा घेतला. एकीकडे मुलगी सापडल्याचा आनंद तर दुसरीकडे ती गर्भवती असल्याने पोटात चिंतेचे काहूर उमटलेले. घरी गेल्यावर तिची आस्थेने चौकशी करीत धीर दिला. दुसऱ्या दिवशी वध्रेतील महिला डॉक्टरांकडे घेऊन गेले. गर्भ सात महिन्यांचा असल्याने तो पाडता येत नसल्याचे समजल्यावर सेवाग्रामच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला मिळाला. मात्र तेथेही एक तांत्रिक मुद्दा उद्भवला. कुमारिकेला होणाऱ्या बाळाच्या मुलाचे नाव काय टाकायचे, हा पेच होता. कारण मुलगी काहीच बोलायला व प्रियकराविषयी सांगायला तयार नव्हती. त्याने खूप छळलं, एवढेच सांगायची. अत्यंत घाबरलेल्या या मुलीला तसेच तिच्या वडिलांना अखेर आधार मिळाला.

एका कुटुंबाच्या मदतीसाठी सेवाग्राम रुग्णालयात जात असलेल्या उमेद संस्थेच्या सेवाभावी कार्यकर्त्यां मंगेशी मून यांच्याशी या कुटुंबाची गाठ पडली. त्यांनी सदर मुलीला धीर दिला.

होणाऱ्या बाळाला आपले नाव देण्याची तयारी मून यांनी दर्शवली. तसा लेखी करारनामा करण्यात आला. वडिलांना अत्यानंद झाला. ६ ऑक्टोबरला बाळाचा जन्म झाला. दोघांचीही प्रकृती आता ठीक आहे. एकप्रकारे अनाथच ठरलेल्या या बाळाचा सांभाळ श्रीमती मून करणार आहेत, तर मुलीचे पुढील आयुष्य मार्गी लावण्याचा व तिला नवे जीवन देण्याचा संकल्प पित्याने केला आहे. फसवणूक करणाऱ्या प्रियकराबाबत मुलीला काहीच माहिती नाही. केवळ मजेपुरते सहा महिने त्याने एका चाळीत ठेवल्याची माहिती कानावर पडली. नवजात बाळाचा सांभाळ उमेदच्या संस्थेत होणार आहे. सृष्टीने दिलेले हे दान समजून ते जोपासण्याची भावना उमेदची आहे, तर नव्या जीवनाची स्वप्ने रेखाटणाऱ्या या दुर्दैवी मुलीला पुन्हा उमेदीने उभे करण्याची जबाबदारी वडिलांनी स्वीकारली आहे.