ऊर्जामंत्र्यांचे लोणीकरांना प्रत्युत्तर

जालना : जिल्ह्य़ातील नेर येथील १३२/३३ केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्राची जागा बदलून उटवद येथे करण्यात आल्याचा आरोप करत भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली होती. या पापात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनाही भागीदार करवून घेण्यात आल्याचा आरोप लोणीकर यांनी केला होता. या उपकेंद्राचे भूमिपूजन करताना डॉ. राऊत यांनी प्रत्यक्ष नामोल्लेख टाळून लोणीकर यांचा समाचार घेतला. कुणी जर प्रेमाने अन्याय झाल्याचे सांगितले तर त्यांना सहकार्य करू. परंतु या ठिकाणी उपकेंद्राचे काम करू शकत नाही असे सांगत असतील तर अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

डॉ. राऊत म्हणाले,की पालकमंत्री राजेश टोपे यांनी सातत्याने या उपकेंद्रासाठी पाठपुरावा केला. आमदार कैलास गोरंटय़ाल यांनीही ही मागणी केली. खरे पाहिले तर उपकेंद्राची नियोजित जागा उटवद हीच होती. आम्ही उपकेंद्र इकडून तिकडे नेल्याचा गैरप्रचार काही लोक करीत आहेत. आम्ही कुणाची लेकरे पळवणाऱ्या टोळीतील नाही. लेकरे कुणाचीही असोत, त्यांची जोपासना करून त्यांना मोठे करणारे आम्ही आहोत. उटवद येथे उपकेंद्र होत असल्याने कुणाचा अधिकार हिरावून घेतला असे अजिबात नाही, असेही डॉ. राऊत म्हणाले.

पालकमंत्री राजेश टोपे या वेळी म्हणाले,की मागील पाच वर्षांपासून आपण सातत्याने या उपकेंद्रासाठी प्रयत्न करीत आहोत. यासाठी स्थानिक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सहा एकर जमीन दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. आपण ऊर्जामंत्री असताना या उपकेंद्रास मंजुरी दिली होती. वीज कंपनीच्या संचालक मंडळात मिळालेली मंजुरी आजही पाहण्यास उपलब्ध होऊ शकेल. मागील काळात हे काम थांबविण्यात आले होते. उटवद येथे उपकेंद्र करणे हा दूरदृष्टीचा तसेच शास्त्रीय आणि वैज्ञानिक निर्णय आहे. १३२ केव्ही उपकेंद्रापासून फीडरची लांबी ३० किलोमीटरपेक्षा अधिक असेल तर शेवटच्या ग्राहकास चांगल्या दर्जाची वीज मिळत नाही. त्यामुळे यासाठी उटवद गावाची निवड करण्यात आली, असे टोपे म्हणाले.

उपकेंद्र पळविण्याचे पाप

आपण पालकमंत्री असताना जालना तालुक्यातील नेर येथे १३२ केव्ही उपकेंद्र मंजूर केले होते. पालकमंत्री टोपे नेर येथील उपकेंद्र उटवद येथे पळवून नेण्याचे काम करीत आहेत. वांझोटे भूमिपूजन करून त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये. आपण पालकमंत्री होतो तेव्हा टोपे यांच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासाच्या प्रयत्नांमुळे ‘पालकमंत्री असावा तर बबनराव लोणीकर यांच्यासारखा’ अशी जनभावना निर्माण झाली होती. आपण मंजूर केलेले उपकेंद्र पळविण्याचे पाप टोपे यांनी केले असून त्यामध्ये ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनाही भागीदार केले आहे. आपण पालकमंत्री असताना नेर येथे या उपकेंद्राचे भूमिपूजन होऊन निधीची तरतूदही करण्यात आली होती.

– बबनराव लोणीकर, आमदार, माजी पालकमंत्री, भाजप

मंत्र्यांचा ताफा अडविला

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि पालकमंत्री राजेश टोपे उटवद येथे वीज उपकेंद्र भूमिपूजनासाठी जात असताना त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. ताफ्यातील पोलिसांनी त्यांना रस्त्यातून दूर केले. काळे झेंडे दाखवत या कार्यकर्त्यांनी राऊत आणि टोपे यांच्याविरुद्ध निदर्शने करून घोषणाबाजी केली.