18 September 2020

News Flash

हिंगोली जिल्ह्य़ात दमदार पाऊस

हिंगोली जिल्ह्य़ात प्रथमच मोठा पाऊस झाला. किन्होळा रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने या गावाचा संपर्क तुटला. . खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार असल्याने नदी काठच्या

| September 1, 2014 01:58 am

 या पावसाळ्यात हिंगोली जिल्ह्य़ात प्रथमच मोठा पाऊस झाला. किन्होळा रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे. खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडण्यात येणार असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कयाधू नदी दुसऱ्यांदा वाहण्याची शक्यता या पावसामुळे निर्माण झाली आहे.
 या पावसामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत असून शनिवारी सायंकाळी जिल्ह्यात सुरू झालेला पाऊस रविवारी दुपापर्यंत सुरू होता. वसमत तालुक्यातील किन्होळा रस्त्यावरील पुल वाहून गेल्याने तीन गावाचा संपर्क तुटला आहे. पडलेल्या पावसाची टक्केवारी आता ३४.९ टक्क्यांवर गेली आहे. जिल्ह्यातील सिद्धेश्वर वगळता यलदरी व इसापूर धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. यलदरी ४१ टक्के तर इसापूरमध्ये ४० टक्के पाणीसाठा आहे. खडकपूर्णा प्रकल्पाची पाणीपातळी २९ ऑगस्ट रोजी ५१९.३६ मीटर असून पाणीसाठा १२८.९५ द.ल.घ.मी. झालेला आहे. सध्यस्थितीत धरण परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे धरणात पाणी येत आहे. धरण परिसरात ४८ तासांत अतिवृष्टी व सतर्कतेचा इशारा प्राप्त झाल्याने प्रकल्पामध्ये ५२० मीटर पाणीसाठा निर्माण झाल्यानंतर जलाशय परिचलनानुसार धरणाची दारे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येऊ शकतो, असे खडकपूर्णा प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले.
 रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे. सर्व आकडे मि.मी. मध्ये. कंसात आकडे एकूण पावसाचे :  िहगोली २०.४३ (१९८.१५), वसमत ४१.१४ (२८७.८५), कळमनुरी ७५.१७ (३३०.७०), औंढा नागनाथ २६ (४४०.२५), सेनगाव २३.६७(२७६.५१) पावसाची सरासरी ३७.२८ टक्के एवढी झाली आहे.
नांदेड जिल्ह्य़ात चित्रा नक्षत्रातही दमदार पाऊस
वार्ताहर, नांदेड
मृग आणि त्यानंतरची अनेक नक्षत्रे कोरडीठाक गेल्यानंतर बैलपोळ्याच्या सणानंतर वरुणराजाने यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्य़ावर मोठी कृपा केली. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्य़ात जोरदार पाऊस पडत आहे. त्यात एका दुर्घटनेत एक महिला दगावली.
दोन महिन्यांहून अधिक काळ पावसाने दडी मारल्यामुळे भीषण होत चाललेले चित्र अवघ्या पाच-सहा दिवसांतल्या दमदार पावसाने आता सुसह्य़ झाले असून यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा नदी, नाले प्रवाही झाले.
शनिवारी सायंकाळी जिल्ह्य़ातील नायगाव व मुखेड या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. मुखेड तालुक्यातील रावी येथील इंदरबाई भीमराव देवकते (वय ६०) ही महिला हसनाळ येथे पुरात वाहून मरण पावली. नायगाव तालुक्यातील मौजे हुस्सा शिवारात वीज पडून म्हशीचा मृत्यू झाला.
नांदेड शहरालगतच्या विष्णपुरी प्रकल्पाच्या जलाशयात पाणीपातळी खूप खाली गेल्याने शहर व परिसरावर चिंतेचे ढग दाटले होते. पण गेल्या चार-पाच दिवसांत धरणाच्या वरच्या भागात दमदार पाऊस झाल्याने विष्णुपुरीतील जलसाठा ५० टक्क्यांवर गेला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. कंधार तालुक्यातील लोअर मानार (बारुळ) व अप्पर मानार (लिंबोटी) या धरणांच्या पाणीसाठय़ातही वाढ होत आहे. जिल्ह्य़ातील शेतीसाठी वरदान ठरलेल्या इसापूर धरणातही ५० टक्के पाणीसाठा झाल्याने जिल्ह्य़ाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मघा नक्षत्र संपता-संपता पावसाचे दमदार आगमन झाले. त्यानंतर पूर्वा नक्षत्रानेही जिल्ह्य़ाला पावसाची अपूर्व भेट दिली. सर्वदूर सुरू असलेल्या पावसाने पिण्याच्या पाण्याचे संकट तूर्तास टळले आहे. जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर राहिलेला नाही. मात्र भूगर्भातील पाणीपातळी वर येण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे.
परभणीतही जोरदार पाऊस; सरासरी वाढली
वार्ताहर, परभणी
जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने  जिल्ह्याच्या सरासरीने अडीचशेचा टप्पा ओलांडला. रविवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरू होती.
गणेश चतुर्थीपासून जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे. शुक्रवारी दुपापर्यंत चांगला पाऊस झाला होता. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. शनिवारी रात्रभर जोरदार पाऊस झाला. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच भागात होता. रविवारी सकाळी दहापर्यंत पावसाने झड लावली होती. दुपारनंतरही पावसाळी वातावरण तयार होते. दोन दिवसांत दमदार झालेल्या पावसाने सरासरीचा अडीचशेचा आकडा ओलांडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २६२.१८ मि.मी. पाऊस झाला. त्यामध्ये शनिवारच्या रात्री झालेल्या ३६.५६ मि.मी. पावसाचा समावेश आहे. या पावसाने नदीनाल्यांना पाणी आले आहे. यंदा पहिल्यांदाच दमदार पाऊस झाल्याने पाणी वाहिले आहे. सोनपेठ तालुक्यात आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस झाला आहे. ३१७ मि.मी. पावसाची नोंद या तालुक्यात करण्यात आली. त्यापाठोपाठ पाथरी ३०६, मानवत २८९.४३, जिंतुर २७१, गंगाखेड २६३, पूर्णा २४०, सेलू २३६ तर पालममध्ये सर्वात कमी १९७ मि.मी. पाऊस झाला. शनिवापर्यंत जिल्ह्याची एकूण सरासरी २२५.६२ होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 1:58 am

Web Title: powerful rain bridge swept away
Next Stories
1 मोदींचा शिक्षक दिन; प्रचंड उत्सुकता अन् अनंत अडचणी!
2 तीन दिग्गजांचा गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश
3 तीस टक्के सफाई कामगार प्रत्यक्षात अन्य कामांवर!
Just Now!
X