वीज दरवाढीचा निषेध करण्यासाठी आणि शासनाने ही दरवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी यंत्रमागधारकांतर्फे गेले काही दिवस सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून बुधवारी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भव्य आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली. यावेळी सुमारे ५००आंदोलकांनी स्वत:ला अटक करवून घेतली. त्यात आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल, माजी आमदार निहाल अहमद यांचा समावेश आहे.
पॉवर कंझ्युमर्स असोसिएशनतर्फे आयोजित सर्वपक्षीय आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार निहाल अहमद, आ. मौलाना मुफ्ती इस्माईल, राष्ट्रवादीचे युनूस इसा,युसूफ हाजी, संघटनेचे समन्वयक युसूफ इलियास यांनी केले. सकाळी साडे अकरा वाजता महामार्गावरील दरेगाव नाका भागात मोठय़ा प्रमाणात नागरिक जमा झाले आणि त्यांनी रस्त्यावर ठाण मांडली. पोलीस प्रशासनाने रास्ता रोको न करण्याची केलेली विनंती आंदोलकांनी धुडकावली. दुपारी दीड वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू केले. यावेळी यंत्रमाग व्यवसायातील विविध समस्यांचा ऊहापोह करतानाच आताच झालेल्या वीज दरवाढीमुळे हा व्यवसाय रसातळाला जाऊ शकतो अशी भीती व्यक्त करणारे आणि शासनाने हस्तक्षेप करून ही दरवाढ मागे घेणे कसे आवश्यक आहे, याचे स्पष्टीकरण करणारी अनेकांची भाषणे झाली.
आंदोलनामुळे पोलिसांनी मालेगाव ते धुळे तसेच चांदवड, चाळीसगाव, सटाणा, मनमाड या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय घेतल्याने फारसा परिणाम होणार नाही असे दिसत होते. मात्र बराच वेळ आंदोलन सुरू राहिल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अखेर पोलिसांनी ५०० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार न घडल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
श्रेय कोणाचे?
बुधवारी झालेले आंदोलन वरकरणी सर्वपक्षीय असल्याचे भासविले गेले असले तरी विविध नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असल्याचे तसेच त्यांच्यात एकवाक्यता नसल्याचे पदोपदी जाणवत होते. आमदार मुफ्ती यांनी रस्त्याच्या एका बाजूला भाषण ठोकले तर त्यांचे प्रतिस्पर्धी निहाल अहमद यांनी दुसऱ्या बाजूला भाषण दिले. या शिवाय वरिष्ठ अधिकारी निवेदन घेण्यासाठी या नेत्यांकडे जात असताना नेत्यांमधील विसंवाद दिसत होता. त्यामुळे या अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले. मोठय़ा जनसमुदायासमोर आंदोलनाचे श्रेय कुणी घ्यावे यावरून या नेत्यांमध्ये छुपी चढाओढ असावी असा कयास आंदोलनस्थळी लावला गेला.