करोनाचे संक्रमण पसरण्याची भीती

विरार :विरारमध्ये कचऱ्यात पडलेल्या वैयक्तिक सुरक्षा साधनांचा (पीपीई किट) चा वापर चक्क रेनकोट म्हणून केला जात असल्याचे उघड झाले आहे. या किटची विल्हेवाट न लावता ते थेट रस्त्यावर फेकून दिले जात असल्याने करोनाचा संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

पीपीई किट हे करोनाबाधित रुग्णाचा उपचार करताना, त्याचे नमुने घेताना अथवा कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्यसेवक अथवा डॉक्टर वापरतात. त्यांचा वापर झाल्यावर त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. असे न केल्यास त्यामुळे करोना संसर्ग पसरण्याचा धोका संभवतो. मात्र विरार मध्ये असे पीपीई किट रस्त्यावर  टाकून दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विरार पूर्वच्या आर. जे. नगर परिसरात एका कचरा वेचणारी व्यक्ती चक्क पीपीई किटी (वैयक्तिक सुरक्षा साधन) घालून फिरत होती. स्थानिक रहिवाशी आणि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मनीष राऊत यांनी या व्यक्तीला विचारणा केली असता त्याने कचऱ्यात हे किट सापडले असून रेनकोट म्हणून त्याचा वापर करत असल्याचे सांगितले. एकंदरीत ज्या कुणी पीपीई किट वापरले त्याची विल्हेवाट न लावता थेट रस्त्यावरील कचऱ्यात टाकून दिली.

या कचरा वेचणाऱ्या व्यक्तीने ते वापरेल आणि त्यामुळे करोना संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे या प्रकणी चौकशी करून महापालिकेने अशांवर कारवाई केली पाहिजे असे त्यांनी सांगितले.

चौकशी करण्याचे आदेश

या संदर्भात वसई-विरार महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जैविक कचरा उचलणे आणि त्याची विल्हेवाट लावणे यासाठी महापालिकेने ठेका दिला आहे, त्याप्रमाणे काम होत आहे. पण जर कुठे अशा घटना घडत असतील त्यांनी चौकशी करून कारवाई केली जाईल.