औरंगाबाद जिल्ह्य़ातील ९ मतदारसंघांत ४९ उमेदवारांनी ७७ नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. औरंगाबाद शहरात मध्य व पश्चिम मतदारसंघांत अनुक्रमे शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल व संजय शिरसाट यांनी शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केले.
पितृपक्षात राजकीय गोटात कमालीची शांतता होती. दिवस उजाडताच अर्ज दाखल करणाऱ्यांनी ढोल-ताशांनी निवडणुकीचे वातावरण निर्माण केले. सकाळीच क्रांती चौकात जैस्वाल यांच्या कार्यकर्त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. रॅलीत उघडय़ा जीपवर बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा होती. मध्य मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, या साठी प्रयत्न करणारे माजी आमदार किशनचंद तनवाणी, सुहास दाशरथे ही मंडळी मात्र या वेळी दिसली नाहीत. जैस्वाल यांनी या वेळी शक्तिप्रदर्शन केले. औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट यांनी वाजतगाजत उमेदवारी अर्ज दाखल केला. सूतगिरणी चौकातून कार्यकर्त्यांंनी रॅली काढली. नगरसेवक राजू वैद्य, नंदकुमार घोडेले यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मात्र, युती झाली की नाही याचीच दिवसभर चर्चा होती. प्रत्येक चौकात कार्यकर्त्यांमध्ये जातीची गणितेही चर्चेत होती. याच मतदारसंघातून माजी मंत्री गंगाधर गाडे यांनी पँथर्स रिपब्लिकन पार्टीकडून अर्ज दाखल केला. गाडे यांनी नुकताच एमआयएममध्ये प्रवेश केला. त्यांच्या रॅलीसमोर एमआयएमचे झेंडे होते. या मतदारसंघात संजीवकुमार इखारे, संजय जगताप यांनीही अर्ज दाखल केले.
शिवसेनेचा अर्ज दाखल होताना मध्य मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी अर्ज दाखल केला. ‘खाली कर दो रास्ते, अकबर ओवेसी के वास्ते’ अशी घोषणा त्यांच्या रॅलीत दिली जात होती. या मतदारसंघातून ५जणांनी ६ अर्ज दाखल केले. प्रदीप जैस्वाल, संजय लष्करे, राजगौरव वानखेडे, पूनमचंद्र बामणे व इम्तियाज जलील यांनी अर्ज दाखल केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी बाप्पासाहेब थोरात यांनी सांगितले.
फुलंब्री मतदारसंघात रमेश दहिहंडे यांनी, पैठणमध्ये ५जणांनी, गंगापूर ५जणांचे ७ अर्ज, सिल्लोडमध्ये २ उमेदवारांचे ३ अर्ज, तर कन्नडमधून उदयसिंह राजपूत यांनी २ अर्ज दाखल केले. आतापर्यंत ६८० व्यक्तींनी १ हजार ४१९ नामनिर्देशनपत्रे नेली, तर ४९ उमेदवारांचे ७७ अर्ज दाखल झाले आहेत.