News Flash

‘भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान’; मुख्यमंत्र्यांनी त्या पाच मुलांचं केलं विशेष कौतुक

"आपली नवी पिढीही उमेदीने आणि पुढे जात आहे याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे."

(संग्रहित छायाचित्र)

‘महाराष्ट्राची माती गुणी रत्नांची खाण आहे. त्यावर विविध क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावून आपल्या मुलांनी शिक्कामोर्तब केले आहे,’ अशा शब्दांमध्ये मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. ‘भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे,’ अशी शाबासकी देत मुख्यमंत्र्यांनी सर्व पुरस्कार विजेत्या मुलांचे कौतुकही केलं आहे.

भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून नवनिर्माण, शैक्षणिक यश, क्रीडा, कला आणि संस्कृती ,समाज सेवा, आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना दर वर्षी विशेष पुरस्कार प्रदान केले जातात. यंदा देशभरातील ३२ बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२१ प्रदान करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील पाच मुलांचा समावेश आहे. धाडशी कामगिरीचा शौर्य पुरस्कार – कामेश्वर वाघमारे (जि. नांदेड), नवनिर्माणासाठी श्रीनभ अग्रवाल (नागपूर) व अर्चित पाटील (जळगाव), शैक्षणिक प्रकल्पासाठी सोनित सिसोलेकर (पुणे) आणि क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी काम्या कार्तिकेयन (मुंबई) या पाच जणांना पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कामेश्वर या चौदा वर्षीय बहादूर मुलाने आपल्या जीवाची पर्वा नदीच्या पाण्यात बुडणाऱ्या दोन शाळकरी मुलांचा जीव वाचवला होता. त्याच्या या धाडसाचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापुर्वीच कौतुक केले होते. त्याला या धाडसाबद्दल प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार मिळाल्याबद्दल, मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केलं आहे.

अभिनंदन संदेशात मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राची माती गुणी रत्नांची खाण आहे. हेच आपल्या मुलांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार पटकावून सिद्ध केले आहे. बहादुरीच्या आणि लढवय्येपणात महाराष्ट्र मागे हटत नाही. तसाच तो नवनिर्माण आणि प्रयोगशीलतेतही पुढेच आहे. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही महाराष्ट्राची कामगिरी नेहमीच दिमाखदार राहीली आहे. या क्षेत्रात आपली नवी पिढीही तितक्याच उमेदीने आणि पुढे जात आहे. याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. पुरस्कार प्राप्त या मुलांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. म्हणूनच त्यांच्यासाठी भले शाब्बास, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे, असेही म्हणावे वाटते. पुरस्कारप्राप्त या मुलांमध्ये ही जिद्द आणि चिकाटी निर्माण करणारे त्यांचे कुटुंबीय, पालक तसेच शिक्षक, मार्गदर्शकही कौतुकास पात्र आहेत. त्यासाठी या सर्वांचे आणि पुरस्कार विजेत्या मुलांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या पुढील वाटचालीसही शुभेच्छा देतो, असं म्हणत सर्वांचेच कौतुक केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 4:25 pm

Web Title: pradhan mantri rashtriya bal puraskar 2021 cm uddhav thackeray congratulated winners from maharashtra scsg 91
Next Stories
1 पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? शरद पवारांचा सवाल
2 “कोणाचं लग्न झालं होतं आणि कोणाला किती मुलं सांगू का?”; मुंडे प्रकरणावरुन अजित पवार संतापले
3 “महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात? मग देशाचे कायदे का नाही? हा ढोंगीपणा का?”
Just Now!
X