News Flash

पीकविमा योजनेला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ द्या; ठाकरे सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव

राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली माहिती

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या चालू हंगामासाठी पीकविमा काढण्याची आजची शेवटची मुदत आहे.

राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची आज (१५ जुलै) शेवटची मुदत असून आतापर्यंत सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, असं कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, करोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने २३ जुलै पर्यंत योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव आज राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे.

हेही वाचा – “पीकविम्याला मुदतवाढ देण्याची केंद्राची तयारी, पण…,” दानवेंनी ठाकरे सरकारकडे दाखवलं बोट

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या चालू हंगामासाठी पीकविमा काढण्याची आजची शेवटची मुदत आहे. मात्र गेल्या वर्षी ह्या पीकविम्याच्या बाबतीत प्रचंड गोंधळ झाले होते. तसंच शेतकऱ्यांना वेबसाईट संदर्भातल्या समस्यांसह अनेक तांत्रिक अडचणींनाही सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे पीकविम्याला मुदतवाढ द्यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. याच संदर्भात भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी काल केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेतली होती. केंद्र सरकारची मुदतवाढ देण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

दानवे म्हणाले होते, “केंद्र सरकार पीकविम्याला मुदतवाढ देण्यात तयार आहे. मात्र, त्यासाठी राज्याकडून तसा प्रस्ताव यायला हवा. शेतकऱ्यांची विमा भरण्याची इच्छा असूनही पोर्टल बंद पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरण्यात अडचणी येत आहेत. अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्यामुळे मी केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी केली”.

नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा अन्य रोगांमुळे पिकांचं नुकसान झालं तर त्यासाठी शेतकऱ्याला मदत मिळाली म्हणून २०१६ सालापासून पंतप्रधान पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. खरीप हंगाम सुरु होताच दरवर्षी शेतकरी आपल्या पीकांचा विमा काढून घेतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 1:09 pm

Web Title: pradhanmantri fasal bima yojana maharashtra government extended date of fasal bima dada bhuse vsk 98
Next Stories
1 कोल्हापुरात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल
2 “तुम्ही नेतृत्व करा, मी तुमच्यासोबत काम करेन,” फडणवीसांकडून भुजबळांना आश्वासन
3 भुजबळ भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचं ओबीसी आरक्षणाबद्दल मोठं विधान, म्हणाले…
Just Now!
X