पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या चालू हंगामासाठी पीकविमा काढण्याची आजची शेवटची मुदत आहे. मात्र गेल्या वर्षी ह्या पीकविम्याच्या बाबतीत प्रचंड गोंधळ झाले होते. तसंच शेतकऱ्यांना वेबसाईट संदर्भातल्या समस्यांसह अनेक तांत्रिक अडचणींनाही सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे पीकविम्याला मुदतवाढ द्यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. याच संदर्भात भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी काल केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेतली. केंद्र सरकारची मुदतवाढ देण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या भेटीनंतर रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की, गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी साधारणपणे १५ दिवसांची मुदतवाढ मिळाली तर निश्चितच शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळेल. या संदर्भात राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्राकडे आला आहे का याची चौकशी मी करेन. जर असा प्रस्ताव गेला नसेल, तर त्याचा पाठपुरावा करुन, राज्य सरकारशी बोलणी करुन हा प्रस्ताव पाठवावा अशी विनंती मी त्यांना करणार आहे. राज्य सरकारचा जर आज प्रस्ताव आला तर नक्की पीकविम्याची मुदतवाढ दिली जाईल असं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्र्यांनी मला दिली आहे.

हेही वाचा – काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये धूसफूस; रावसाहेब दानवे म्हणतात, “महाविकास आघाडीचा जन्मच….”

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकार पीकविम्याला मुदतवाढ देण्यात तयार आहे. मात्र, त्यासाठी राज्याकडून तसा प्रस्ताव यायला हवा. शेतकऱ्यांची विमा भरण्याची इच्छा असूनही पोर्टल बंद पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरण्यात अडचणी येत आहेत. अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्यामुळे मी केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी केली आहे.

नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा अन्य रोगांमुळे पिकांचं नुकसान झालं तर त्यासाठी शेतकऱ्याला मदत मिळाली म्हणून २०१६ सालापासून पंतप्रधान पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. खरीप हंगाम सुरु होताच दरवर्षी शेतकरी आपल्या पीकांचा विमा काढून घेतात.