महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची व समविचारी पक्षांची महाआघाडीबाबत चर्चा झाली आहे. शेवटची बैठक कॉग्रेसचे नेते खर्गे यांच्यासोबत होणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमच्या मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही असेही यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

गुरुवारी राष्ट्रवादीची संसदीय समितीची बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा झाली. आणखी काही इच्छुक उमेदवारांशी चर्चा करणार आहोत. येत्या चार-पाच दिवसांत अंतिम उमेदवारांची यादी तयार करू. देशात सर्वच स्तरातून विद्यमान भाजपा सरकारवर तीव्र असंतोष आहे. त्यामुळे आमची आघाडी राज्यात ३५ जागा जिंकेलच असा विश्वास प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला.

शरद पवार यांनी माढामध्ये निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याबाबत लवकरच अधिकृत निर्णय होईल. मनसे सध्या मोदींच्या विरोधात आहे, त्यामुळे ते आम्हाला सहकार्य करतील अशी आशा आहे असं यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

प्रकाश आंबेडकर यांनाही सोबत घेण्याचा आमचा विचार आहे. पण राजकारणात एका हाताने टाळी वाजत नाही, आम्ही अजूनही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत अशी माहिती यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी दिली.