19 January 2019

News Flash

छगन भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा गुन्हाच: प्रकाश आंबेडकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मी पंतप्रधान झाल्याचे नरेंद्र मोदी यांचे विधान म्हणजे एक नौटंकी असून मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी प्रथम देशातील आर्थिक दुर्बल घटकातील

(संग्रहित छायाचित्र)

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आता भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरही मैदानात उतरले आहेत. छगन भुजबळ यांच्या चौकशीतून अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यानंतरही भुजबळांना तुरुंगात ठेवणे हा गुन्हा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना छगन भुजबळ यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छगन भुजबळ यांना चौकशीसाठी अटक केली. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले नसून त्यांची पुन्हा चौकशी करण्यात यावी, यासाठी तपास यंत्रणेने न्यायालयाकडे वेळ मागितला. मात्र, चौकशीत छगन भुजबळ यांच्याविरोधात ठोस माहिती पुढे आलेली नाही. तरी देखील, भुजबळ यांना तुरुंगात ठेवणे हा गुन्हाच आहे, असे ते म्हणालेत. कोणीही चौकशीत दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण दिले जाईल, अशी घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने केली होती. मात्र अद्यापपर्यंत त्यावर निर्णय झाला नसून त्या विरोधात २० मे रोजी पंढरपूरमध्ये भव्य परिषद घेऊन जाहीर भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मी पंतप्रधान झाल्याचे नरेंद्र मोदी यांचे विधान म्हणजे एक नौटंकी असून मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी प्रथम देशातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती रद्द केली. आता तेच म्हणतात बाबासाहेबांमुळे मी पंतप्रधान झालो, अशा त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

First Published on April 16, 2018 6:01 pm

Web Title: prakash ambedkar backs chhagan bhujbal says keeping him in jail is injustice