प्रसारमाध्यमांनी उभे केलेले कागदी वाघ माझ्यासमोर उभे राहू शकणार नाहीत. मी कालही राजा होतो, आजही राजा आहे आणि उद्याही राजा राहणार, असे सांगत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर शरसंधान साधले. ते शनिवारी कोल्हापूरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘सार्वत्रिक निवडणुका याच वर्षी’

दलितांचे नेते असलेल्या रामदास आठवले यांची सध्या समाजाशी असलेली नाळ तुटली आहे. या संधीचा फायदा घेऊन स्वत:चे नेतृत्त्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने तुम्ही भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर महाराष्ट्र बंदची हाक दिलीत का?, असा सवाल यावेळी प्रकाश आंबेडकर यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वावर टीका केली. मी कालही राजा होतो, आजही राजा आहे आणि उद्याही राजा राहील. तुम्ही उभे केलेले कागदी वाघ माझ्यासमोर उभे राहू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांना स्वत:पर्यंत मर्यादित ठेवावे, असे सांगत आंबेडकर यांनी रामदास आठवलेंवर निशाणा साधला. या माध्यमातून दलित समाजाचा नेता म्हणून आठवलेंना मोठे करण्यात प्रसारमाध्यमांचा वाटा असल्याचे आंबेडकरांनी अधोरेखित करायचा प्रयत्न केला. त्यामुळे आता रामदास आठवले या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आठवले यांचेही हिंदुत्ववादी संघटनांकडे बोट

काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी संभाजी भिडे यांच्या हस्तकाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार गिरीश बापट यांच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. भीमा-कोरेगावमध्ये १ जानेवारी २०१८ रोजी हल्ला दलितांवर करण्यात आला. त्यात अपेक्षेनुसार माणसे मेलेली नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना ठार मारले पाहिजे, असा संदेश रावसाहेब पाटील नावाच्या व्यक्तीने समाजमाध्यमांद्वारे पाठवला. पाटील हा संभाजी भिडे यांचा अनुयायी आहे. राजकीय पक्ष या नात्याने आमचे आणि मुख्यमंत्र्यांचेही मतभेद आहेत. पण याचा अर्थ असा नव्हे की एकमेकांचा खून करावा. त्यामुळेच संभाजी भिडे हे एक प्रकारे हाफिज सईदसारखे आहेत, हा आमचा आरोप सत्य असल्याचे सिद्ध होते, असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.