22 February 2019

News Flash

एमआयएमबरोबर आघाडीची बोलणी होऊ शकते- प्रकाश आंबेडकर

लोकशाही मानणाऱ्या पक्षाबरोबर आघाडी होऊ शकते. एमआयएम हा लोकशाही मानणारा पक्ष आहे.

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद : लोकशाही मानणाऱ्या पक्षाबरोबर आघाडी होऊ शकते. एमआयएम हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर निवडणुकीमध्ये बोलणी होऊ शकते, असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. औरंगाबाद येथे पत्रकार बैठकीत बोलताना ओवेसी आणि कांशीराम यांच्या राजकारणाचा पोत कसा सारखाच आहे असे सांगत ओवेसी यांच्यामागे राजकीयदृष्टय़ा मुस्लीम समुदाय वळल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर आघाडीची नवी समीकरणे जुळवून येऊ शकतात, असे संकेत आंबेडकर यांनी दिले. त्यांनी पुढे केलेला    मैत्रीचा हात योग्य असून आम्हीदेखील प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर राजकीय आघाडी करण्यास  तयार असल्याचे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

लोकशाही मानणाऱ्या कोणत्याही पक्षाबरोबर राजकीय आघाडी होऊ शकते, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी  काँग्रेसबरोबर  आघाडीची बोलणी करण्यास सकारात्मक असल्याचे म्हटले, पण काँग्रेस कर्नाटकात ज्या पद्धतीने वागली त्यावरून जागावाटपात ते तिढा निर्माण करतील, असेही सांगितले. नव्या आघाडींच्या समीकरणात एमआयएमही असू शकेल, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, राजकीयदृष्टय़ा मुस्लीम समाजाला वंचित ठेवले असल्याची भावना असल्यामुळे ओवेसींच्या पाठीमागे मुस्लीम समाज उभा राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. पण ते नव्याने स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीचे मित्रपक्ष असू शकतील का, या प्रश्नाच्या उत्तरात प्रकाश आंबेडकर म्हणाले, की ते लोकशाही मानणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबर बोलणी होऊ शकते. त्यांच्या या वक्तव्याच्या अनुषंगाने एमआयएमच्या नेत्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी आमदार इम्तियाज जलील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘दलितांचा केवळ मताचा राजकारणासाठी उपयोग करून घेतला गेला. त्यांनाही राजकारणामध्ये मुख्य राजकीय पक्षांनी फारसे स्थान दिले नाही. तोंडी लावण्याइतपत पदे देऊन दलितांचा वापर केला गेला. त्यामुळे दलित आणि मुस्लीम अशी एकी झाली तर प्रभाव असणाऱ्या मतदारसंघात आम्ही निश्चितपणे यश मिळवू शकू.’

वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेनंतर मराठवाडय़ासह सोलापूरचा दौरा केल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केला.

काँग्रेसबरोबर आघाडी करावयाची झाल्यास लोकसभेच्या १२ जागा वंचित बहुजन आघाडीला द्याव्यात, असा प्रस्ताव आहे. मात्र, कर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेसने जागा वाटप करताना दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्याशी संबंधित गटाला चार जागा दिल्या नव्हत्या. त्यामुळे ते आघाडीसाठी किती पुढे येतात, हे पाहावे लागेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकरांशी बोलणी करू, असे म्हटले होते. त्याचे काय झाले, असे विचारले असता प्रकाश आंबेडकरांनी आघाडीबाबतची शक्यता नाकारली नाही. त्यांनी कांशीराम आणि ओवेसी यांच्या राजकारणाचा पोत सारखा असल्याचे सांगितले.  दलित आमच्या पाठीमागे आहे, असे कांशीराम म्हणायचे आणि ओवेसी मुस्लीम माझ्या मागे आहेत, असे सांगतात. गेल्या काही दिवसांत सत्तेपासून लांब असणारा मुस्लीम समाज ओवेसीच्या बाजूने झुकत आहे, असे दिसते आहे. त्यांच्या राजकीय खेळ्यांच्या बाजूने मुस्लीम समाज जात आहे. त्यांचा पक्षही लोकशाही मानणारा पक्ष असल्याने येत्या काळात एमआयएमशीदेखील बोलणी होऊ शकते, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पवार पुरोगामीही आणि प्रतिगामीही

शरद पवार हे कधीही शेतकऱ्यांचे नेते नव्हते आणि नाहीत. ते पुरोगामीही असतात आणि प्रतिगामीही. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात त्यांच्या बरोबर आघाडीशी बोलणी झाली, तर आमच्याकडून अटी टाकल्या जातील, असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे डाव्या बाजूने झुकले आहेत असे आपल्याला वाटते काय, या प्रश्नाच्या उत्तरात आंबेडकर म्हणाले, ‘ते डावीकडेही झुकले आहेत आणि उजवीकडेही. आमच्या भटक्यांमध्ये बोलत बोलत चुना लावून जाणारेही असतात, तसे ते वाटतात’, अशा शब्दात पवारांची खिल्ली उडवताना ते शेतकऱ्यांचे नेते नाहीत या त्यांच्या विधानाचा त्यांनी पुनरुच्चार केला.

First Published on July 10, 2018 12:26 am

Web Title: prakash ambedkar hints at alliance with mim