“हे सरकार दारुड्यासारखं आहे, दारुड्या व्यक्तीला दारू नाही मिळाली तर तो जसा घरातील वस्तू विकतो त्याप्रमाणे हे सरकार सोन्याची अंडी देणारी भारत पेट्रोलियम कंपनी विकायला निघाले आहे”, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा सरकारवर निशाणा साधला. यामुळे प्रचंड बेरोजगारी भविष्यात वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या एनआरसी, एनपीए आणि सीएए कायद्याविरोधात 24 तारखेला महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. त्यामध्ये 35 संघटना सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी काल (18 जानेवारी) पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती.

देशात लोकशाही दिसत नसून हिटलरशाही दिसते :
“देशाची आजची परस्थिती अराजकता माजेल अशी झाली आहे. या परिस्थितीला भाजपा आणि आरएसएस हे जबाबदार आहेत. कारण देशात लोकशाही दिसत नसून हिटलरशाही दिसत आहे. धमकावणे, दहशत निर्माण करण्याचे काम सुरू आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे”, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

मी नाईट लाईफ अनुभवली : मी नाईट लाईफच्या बाजूने असून ही लाईफ मी अनुभवली आहे. त्यामुळे सर्व घटकाला याचा फायदा होणार आहे, असे सांगत. राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले.