आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसवर अबलंबून नसल्याचे भारिप बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मी एखाद्याचा हात धरला तर सोडत नाही. त्यामुळे आम्ही एमआयएमबरोबर राहू, असे त्यांनी निक्षून सांगितले. सुरवातीला आम्ही काँग्रेसला आघाडीबाबत विचारणा केली होती. मात्र त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे हे आपल्याशी आता चर्चा करत असून त्याना कितपत अधिकार आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

होलार समाजाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ते पंढरपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेस सोबत सुरवातीला चर्चा झाली. आम्हीपण काँग्रेसला सोबत घेवून आघाडीची मागणी केली होती. मात्र काँग्रेसने लक्ष दिले नाही. मात्र ज्या वेळेस एमआयएमला सोबत घेणार असे जाहीर केले आणि बोलणी झाली. त्यावेळेपासून काँग्रेस अस्वस्थ झाली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत आंबेडकरांना घेऊ नये असे, जयंत पाटील यांनी जाहीर केले. या बाबत आंबेडकर याना विचारले असता जयंत पाटील यांची राष्ट्रवादी ही सनातनी असल्याचे म्हणत आम्ही काँग्रेसवर अवलंबून नाही, असे ते म्हणाले.

राज्यातील काँग्रेस नेते करत असलेल्या चर्चेस दिल्लीतील नेत्यांचा होकार असण्याबाबत आंबेडकरानी शंका उपस्थित केली. राज्यात विखे-पाटील, माणिकराव ठाकरेंना कितपत अधिकार आहे, याबाबत शंका असल्याचे त्यांनी सांगितले. एमआयएमशी आमची युती आहे. त्याना एमआयएम नको आहे. काँग्रेसच्या केंद्रातील नेत्यांनी याबाबत आपल्याला खुलासा करावा, असे सांगत आंबेडकरानी चेंडू काँग्रेसकडे टोलावला आहे.