उस्मानाबाद : आपण दलितोत्तर राजकारण करू नये यासाठी स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या पक्षातील ‘जाणत्या नेत्यां’चाच आपल्या वंचित आघाडीला विरोध होत आहे. आपल्यावर दबाव आणला जात असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी येथे बोलताना काँग्रेस, राष्ट्रवादीचे नाव न घेता केली.

पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, की राज्यातील धनगर, माळी, कोळी अशा प्रत्येक जातीच्या उमेदवारांना लोकसभेसाठी किमान दोन जागा द्याव्यात, असा प्रस्ताव आपण सर्वच धर्मनिरपेक्ष पक्षांसमोर मांडला आहे. अद्याप आपणास कोणीच प्रतिसाद दिलेला नाही. समाजातील वंचित घटकांना मागील ७० वर्षांत देशाच्या सभागृहात जाण्याची संधी मिळालेली नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) संविधानविरोधी धोरणांना रोखायचे असेल तर सर्व वंचित घटकांना समान संधी द्यायला हवी. पण स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे पक्षच घराणेशाहीला सर्वात जास्त प्राधान्य देतात. त्यामुळे तर अद्याप आपल्या प्रस्तावास त्यांनी अनुकूलता दर्शविली नाही.

केंद्र आणि राज्य सरकारचा दहशत निर्माण करणे हा धोरणात्मक कार्यक्रम सध्या सुरू आहे. मुक्त विचार करणाऱ्यांना दबावाखाली घेतले जात आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांप्रमाणे यांना भ्रष्टाचार करता येत नाही, म्हणून अधिकारी वर्गाला धमकावून पसा गोळा केला जात असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला. हेच सरकार पुन्हा निवडून आल्यास घटनेवर टांगती तलवार राहणार आहे. द्वेषाचे आणि तिरस्काराचे राजकारण हा यांचा मुख्य कार्यक्रम आहे.

समाजातील स्वास्थ्य अबाधित राखणे प्रत्येक परिवर्तनवादी नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यासाठी आपण समाजातील वंचित घटकांची मोट मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र राज्यातील ‘जाणत्या नेत्यां’ना आपले हे प्रयत्न रुचत नसल्याचे दिसून येत आहे. या ‘जाणत्या’ नेत्याचे नाव काय, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर लोक ओळखून घेतील, अशा शब्दांत आंबेडकर यांनी प्रतिक्रिया नोंदवली

 

सुप्रिया सुळे, अजित पवार, राहुल गांधींना विरोध

स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे पक्षच सध्या घराणेशाहीला सर्वात जास्त प्राधान्य देत आहेत. आमच्या प्रस्तावास अनुकूलता न मिळण्याचे हेही एक कारण आहे. पण सुप्रिया सुळे, अजित पवार आणि राहुल गांधी यांना जर त्यांच्या पक्षांनी उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्यासोबत असणार नाही, असेही आंबेडकर यांनी या वेळी जाहीर केले.