17 January 2019

News Flash

मेहता गेले, चव्हाण आले!

भाजपला कितपत फायदा?

प्रकाश मेहता ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भाजपला कितपत फायदा?

पक्षांतर्गत नाराजी आणि जिल्ह्य़ातील प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष प्रकाश मेहता यांना महागात पडले आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरून अखेर त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेहता यांच्या कार्यप्रणालीमुळे भाजप सरकारबाबत जिल्ह्य़ात नकारात्मक वातावरण झाले होते. ते दूर करण्याचे काम चव्हाण यांना करावे लागणार आहे. भाजपच्या या प्रतिमा सुधार मोहिमेला रायगडकरांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार अस्तित्वात आल्यावर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना रायगडचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले. मात्र रायगडचे पालकमंत्री म्हणून त्यांची तीन वर्षांची कारकीर्द चांगलीच वादग्रस्त ठरली. कधी पत्रकारांशी केलेल्या उद्धट वर्तनामुळे, तर कधी सावित्री दुर्घटनेच्या स्थळी सेल्फी काढण्याच्या कारणामुळे, तर कधी ध्वजारोहण सोहळ्यांना गैरहजर राहिल्याने ते कायम चर्चेत राहिले. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत रायगड जिल्ह्य़ात भाजपाची ताकद मर्यादित आहे. कार्यकर्त्यांना सत्तेचे बळ देऊन संघटनात्मक बांधणी करण्याची चागंली संधी मेहता यांना या निमित्ताने आली होती. मात्र या संधीचा त्यांनी फायदा घेतला नाही. स्थानिक कार्यकर्ते आणि त्यांच्या प्रश्नाकडे मेहता यांनी आपुलकीने पाहिले नाही. याउलट शेकापशी चांगले संबध ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे हळूहळू कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून अलिप्त राहण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या कार्यप्रणालीवर सत्ताधारी पक्षांमध्येच नाराजीचा सूर होता. अखेर मुख्यमंत्र्यांच्या कर्जत येथील दौऱ्यानंतर मेहता यांचे पालकमंत्रीपद तडकाफडकी काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

मेहता यांच्या जागेवर डोंबिवली येथील रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षांतर्गत नाराजी दूर करणे, संघटनात्मक बांधणीला चालना देणे, मेहता यांच्या कार्यप्रणालीमुळे तयार झालेली जनमानसातील भाजप सरकारची प्रतिमा सुधारणे, स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य देणे, रेंगाळलेले प्रकल्प मार्गी लावणे अशा विविध पातळ्यांवर चव्हाण यांना काम करावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीला अवघे एक वर्ष राहिले आहे. विधानसभा निवडणुकही याच वेळी घेण्याच्या चर्चाना उधाण आले आहे. शिवसेनेने स्वबळावर निवडणुकीची भाषा सुरू केली आहे. अशा पक्षाची मर्यादित ताकद असणाऱ्या रायगड जिल्ह्य़ात भाजपची ताकद वाढवण्याचे मोठे आव्हान चव्हाण यांना पेलावे लागणार आहे.

जिल्ह्य़ात पनवेल आणि उरण तालुक्यातील शहरी भाग सोडला तर भाजपचे अस्तित्व फारसे नाही, एक आमदार, पनवेल महानगरपालिका, उरण नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे चार सदस्य एवढय़ाच मर्यादित ताकदीच्या जोरावर चव्हाण यांना पुढील वाटचाल साध्य करावी लागणार आहे. जिल्हा नियोजन मंडळावर शेकाप आणि राष्ट्रवादीचे यांचे असलेले प्रभुत्व ही या वाटचालीतील सर्वात मोठी अडचण असणार आहे. कारण निधीविनियोगात हे दोन्ही पक्ष आडकाठी निर्माण करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कार्यभाग साधणे म्हणजे तारेवरची कसरत ठरणार आहे.

प्रकाश मेहता यांनी पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्य़ाच्या प्रशासनावर आपली पकड कधी मजबूत केली नाही. याउलट शेकाप आणि राष्ट्रवादीने प्रशासनावर आपला दबावतंत्राचा वापर केला. त्यामुळे सत्तेत असूनही जिल्ह्य़ाच्या प्रशासनावर विरोधकांचे वर्चस्व कायम राहिल्याचे चित्र तयार झाले. भाजप कार्यकर्त्यांनी मांडलेल्या प्रश्नांची प्रशासनाकडून दखलही घेतली जात नव्हती. ही परिस्थिती बदलण्याचे काम चव्हाण यांना आगामी काळात करावे लागणार आहे.

तीन वर्षांच्या काळात मेहता यांनी स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काहीच प्रयत्न केले नाही. त्यामुळे जनतेमध्ये त्यांची आणि पर्यायाने पक्षाची नकारात्मक प्रतिमा जनमानसात तयार झाली. या पाश्र्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करून भाजपने प्रतिमा सुधार मोहीम राबवण्याचा प्रयत्न केला आहे. या मोहिमेत चव्हाण कितपत यशस्वी होणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

शतप्रतिशत भाजप हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी जे करणे शक्य होईल ते केले जाईल. वेळ कमी आहे. पण पुढच्या वेळीही आमचेच सरकार सत्तेत येणार आहे. बेरजेच्या राजकारणात जे सोबत येतील त्यांना पक्षात समावून घेतले जाईल. जिल्ह्य़ातील प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी लवकरच विभागवार बैठका मी घेणार आहे.    – रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, रायगड. 

कारकीर्द वादग्रस्त

रायगडचे पालकमंत्री म्हणून प्रकाश मेहता यांची तीन वर्षांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. कधी पत्रकारांशी केलेल्या उद्धट वर्तनामुळे, तर कधी सावित्री दुर्घटनेच्या स्थळी सेल्फी काढण्याच्या कारणामुळे, तर कधी ध्वजारोहण सोहळ्यांना गैरहजर राहिल्याने ते कायम चर्चेत राहिले.

First Published on February 15, 2018 1:48 am

Web Title: prakash mehta ravindra chavan