19 March 2019

News Flash

Pranab Mukherjee at RSS Event: तीन महिन्यांपुर्वीच प्रणव मुखर्जींच्या नावावर झालं होतं शिक्कामोर्तब

गेल्या आठ वर्षात पहिल्यांदाच एखादी राजकीय व्यक्ती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहिले

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमासाठी नागपुरला जाण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसच्या भुवया उंचावल्या. यानंतर त्यांना जाऊ नये की जावे यावरुन वाद प्रतिवाद सुरु झाले. ३० जूनला प्रणव मुखर्जी यांनी आरएसएसच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी होकार दिला असल्याची माहिती समोर आली होती. पण तसं पहायला गेलं तर, प्रणव मुखर्जी कार्यक्रमाला येणार असल्याचं तीन महिन्यांपुर्वीच ठरलं होतं. विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षात पहिल्यांदाच एखादी राजकीय व्यक्ती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून हजर राहिला.

प्रणव मुखर्जींना कार्यक्रमाचं निमंत्रण कधी देण्यात आलं होतं असं विचारलं असता आरएसएसचे विचारक आणि माजी भाजपा नेता के एन गोविंदाचार्य यांनी सांगितलं की, ‘तसं पहायला गेलं तर या गोष्टी डिसेंबर आणि जानेवारीमध्येच ठरवल्या जातात. मार्चपर्यंत नावावर शिक्कामोर्तब केलं जातं. कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी पाच ते सहा नावे ठरवली जातात. त्या सर्वांशी चर्चा केली जाते, भेटीगाठी केल्या जातात. यावेळी सर्वात पहिलं नाव प्रणव मुखर्जींचं असण्याची शक्यता आहे आणि ते येण्यासाठी तयार झाले असावेत’.

काय बोलले प्रणव मुखर्जी ?
Pranab Mukherjee at RSS Event : वसुधैव कुटुंबकम् हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. भारताला पाच हजार वर्षांची संस्कृती आहे आणि विशेष बाब म्हणजे ही संस्कृती अद्यापही टिकून आहे ही बाब गौरवशाली आहे असे मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. एवढेच नाही तर प्रत्येकाने देशाबाबत निष्ठा बाळगणे हीच देशभक्ती आहे असेही त्यांनी म्हटले. हेडगेवार हे भारतमातेचे सुपुत्र आहेत आहेत अशी प्रशंसा प्रणव मुखर्जी यांनी केली. तसेच आपल्या भाषणात भारतीय संस्कृतीचे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यांचे गुणगान गायले. विशेष बाब म्हणजे आपल्या भाषणात त्यांनी टीकाकारांचा उल्लेखही केला नाही.

आपल्या भाषणात सम्राट अशोक, सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्यापासून महात्मा गांधी, पंडित नेहरू यांच्यापर्यंतचे दाखले त्यांनी दिले. जनतेच्या आनंदातच राजाचा आनंद असायला हवा असे मत यावेळी प्रणवदांनी व्यक्त केले. विविधता ही भारताची शक्ती आहे कारण देशात विविधता असूनही आपण सगळे भारतीय आहोत ही बाब आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवते असेही प्रणवदांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादाबाबत ते म्हटले की, राष्ट्रवाद हा कोणत्याही भाषा, रंग, जात, धर्माशी संबंधित नसतो. तसेच असहिष्णुतेमुळे देशाची ओळख धूसर होऊ लागते. देशाप्रती प्रत्येकाने खऱी निष्ठा बाळगणे हीच खरी देशभक्ती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यात अनेकांचे योगदान होते. त्यानंतर १९५० मध्ये घटना तयार झाली. या संविधानामुळे राष्ट्रीय भावना दृढ होते. विविधता आणि त्यातील एकता हेच आपल्या देशाचे सौंदर्य आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

First Published on June 8, 2018 4:02 am

Web Title: pranab mukherjee at rss event 2