नाशिकमधील ढगाळ हवामानामुळे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे शिर्डीतील वास्तव्य पाऊण तास लांबले. हवाई सिग्नलअभावी हेलिकॉप्टरमधून उतरून त्यांना पुन्हा विश्रामगृहावर सक्तीचा आराम करावा लागला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेचीही चांगलीच धावपळ उडाली. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी साईबाबांच्या दर्शनासाठी शनिवारी शिर्डीला आले होते. लष्काराच्या विशेष हेलिकॉप्टरने दुपारी २.२५ वाजता त्यांचे शिर्डीत आगमन झाले. निर्धारित कार्यक्रमानुसार सव्वाचार वाजता ते हेलिकॉप्टरनेच येथून नाशिक विमानतळाकडे रवाना होणार होते. त्यानुसार ते हेलिपॅडवर आले, हेलिकॉप्टरमध्येही बसले, मात्र त्याच वेळी नाशिक येथून सिग्नल न मिळाल्याने त्यांचे उड्डाण थांबवण्यात आले. ओझर (नाशिक) विमानतळ परिसरातील ढगाळ हवामानामुळे त्यांचे शिर्डी येथील उड्डाण लांबणीवर टाकण्यात आले. त्यामुळे राष्ट्रपतींना हेलिपॅडवरून पुन्हा विश्रामगृहावर यावे लागल्याने सुरक्षा यंत्रणा व पोलिसांसह सर्वाचीच धांदल उडाली. पुन्हा विश्रामगृहावर येऊन त्यांना सुमारे पाऊण तास थांबावे लागले. हवामान स्वच्छ झाल्यानंतर नाशिक येथून सिग्नल मिळाल्यानंतर त्यांचा ताफा पुन्हा हेलिपॅडवर आला व सायंकाळी ५ वाजता राष्ट्रपती नाशिककडे रवाना झाले. दुपारी २.२५ वाजता राष्ट्रपती श्री साईबाबा समाधी मंदिरात पोहोचले. त्यांनी साईंची पाद्यपूजा व आरतीही केली. संस्थानच्या त्रिसदस्य समितीच्या वतीने अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश जयंत कुलकर्णी यांनी साईमूर्ती, शाल, लाडू प्रसाद, उदी तसेच इंग्रजी व बंगाली भाषेतील साईचरित्र ग्रंथ देऊन राष्ट्रपतींचा सत्कार केला. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दुपारी हेलिपॅडवर राष्ट्रपतींचे स्वागत केले. त्यांच्या समवेत महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकर नारायण, पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर होते. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा न्यायाधीश जयंत कुलकर्णी, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुमित्रा कोते आदींसह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.