News Flash

प्रणिता बोराचे चित्र पंतप्रधान कार्यालयात झळकले!

पंतप्रधानांच्या कार्यालयात लावण्यासाठी माझ्या चित्राची निवड होणे, हा माझा मोठा बहुमानच आहे,

1) प्रणिता बोरा 2)पंतप्रधान कार्यालयात झळकलेले चित्र.

नगर : शहरातील चित्रकार प्रणिता प्रविण बोरा हिचे ‘उलुखबन्धनम्’ या ‘कॉन्टॅप्ररी आर्ट’ या शैलीतील चित्र पंतप्रधान कार्यालयात लावण्यात आले आहे. गेल्या आठवडय़ापासून प्रणिताने काढलेले चित्र पंतप्रधानांच्या कार्यालयात झळकत आहे. चित्रातील चेहऱ्यावर नाकीडोळी नसतानाही, चित्रातून व्यक्त होणारे भाव हे या चित्राची खासियत आहे. श्रीकृष्ण गोपींच्या रोज खोडय़ा काढत असे, त्यामुळे गोपींनी तक्रार केल्यानंतर यशोदेने श्रीकृष्णाला मोठय़ा उखळाला बांधून ठेवले, असा चित्राचा विषय आहे.

पंतप्रधानांच्या कार्यालयात लावण्यासाठी माझ्या चित्राची निवड होणे, हा माझा मोठा बहुमानच आहे, माझ्यासाठी हा खूपच आनंदाचा क्षण आहे. माझे आईवडील, गुरुजन यांच्या आशीर्वादानेच मला हे यश मिळाले, यामुळे माझी आणखीन चांगले काम करण्याची जबाबदारी वाढली आहे, अशी प्रतिक्रिया प्रणिताने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. केंद्र सरकारच्या ललित कला अकादमीची राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्रणिताला ऑगस्ट २०१८ मध्ये मिळाली होती. त्यावेळी तिने चित्रांचे पुस्तक तयार करुन अकादमीकडे दिले होते. अकादमीनेच स्वत:हून तिची चित्र पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवली होती. पंतप्रधान कार्यालयातील निवड समितीने प्रणिताच्या चित्राची निवड करुन ते कार्यालयात दर्शनी भागात झळकवले आहे.

प्रणिताने जीडी फाईन आर्टमध्ये पदवी मिळवली आहे. बाँबे आर्ट सोसायटीने तिच्या चित्रांचे प्रथम २०१५ मध्ये प्रदर्शन भरवले होते. मागील वर्षी मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत तिच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले गेले होते. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मॉडर्न आर्ट गॅलरी यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धातून तिने पारितोषिके मिळवली आहेत. लवकरच तिचे दिल्लीत चित्र प्रदर्शन भरवले जाणार आहे. परदेशातही प्रदर्शन आयोजित करण्याचा तिचा मानस आहे. प्रणिता शास्त्रीय संगीताचीही विद्यार्थिनी आहे. आनंदवनच्या श्रमसस्कार शिबिरात ती सहभागी होत असते. वडील, शहरातील व्यावसायिक प्रविण बोरा यांच्याबरोबरीने प्रणिता नगरच्या स्नेहालय संस्थेच्या कार्यात सहभागी होत असते.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 4:01 am

Web Title: pranita pravin bora painting appeared in the pm office
Next Stories
1 बारामतीत आंतरजातीय विवाहाच्या वादातून मुलीचा खून ; आई अटकेत
2 ९५ हजार दुबार मतदार?
3 वनविभागाकडून आदिवासींची अडवणूक
Just Now!
X