आमदार प्रणिती शिंदे यांची टीका

सोलापूर : राज्यात आणि केंद्रात दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता असतानासुध्दा सोलापूर महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या महाभोंगळ कारभारामुळे शहराच्या विकासाचा बटय़ाबोळ झाला आहे. मोठा गाजावाजा करून आणलेल्या स्मार्ट सिटी मिशनचा बोऱ्या वाजला आहे. नागरिकांना रात्रंदिवस कधीही पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. हा ‘स्मार्ट विकास’ नव्हे तर ‘स्मार्ट वाट’ लागल्याची टीका काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.

सोलापूर श्रमिक पत्रकार संघात मंगळवारी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात आमदार शिंदे यांनी सत्ताधारी भाजपच्या कारभारावर चौफेर टीकास्त्र सोडले. मध्यंतरी शहरात पाऊस पडला असता अनेक ठिकाणी पावसाचे पाणी मोठय़ा प्रमाणात साचले होते. अनेक चाळींमध्ये घराघरांत पाणी शिरले होते. एरव्ही, पावसाचे पाणी साचत नाही, अशा ठिकाणीसुध्दा पाणी साचल्याचे चित्र समस्त सोलापूरकरांनी पाहिले आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षाचा राजा ज्या पध्दतीने कारभार करतो, तसाच भोंगळ कारभार त्यांच्याच महापालिकेत सुरू आहे. पक्षांतर्गत गटबाजी व हेवेदावे यांच्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. समस्त नागरिकांचा अपेक्षाभंग झाल्याचे मत आमदार शिंदे यांनी व्यक्त केले.  सोलापुरात सुमारे २३०० कोटी खर्चाची ‘स्मार्ट सिटी मिशन’अंतर्गत विकासकामे होत आहेत. ही विकासकामे पाहिली तर हीच काय ती स्मार्ट सिटी, असा प्रश्न पडतो. स्मार्ट सिटीच्या कामांतून काहीही साध्य होणार नसून उलट शहराची वाट लागणार आहे. एकीकडे स्मार्टसिटीच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे सुमारे साडेदहा लाख लोकसंख्येच्या सोलापूर शहराला नियमित व सुरळीतपणे पाणीपुरवठा होऊ शकत नाही, चाललेला कारभार केवळ दिखाऊपणाचा आहे. तळागाळाच्या नागरिकांपर्यंत विकासाचा मार्ग जात नाही. पाण्याच्या प्रश्नावर सत्ताधारी भाजप बोलायलाही तयार नाही. पाण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीही आणता येत नाही. त्यांची कुवतच नाही, तर त्यांच्याकडून अपेक्षा करायच्या कशा, असाही सवाल आमदार शिंदे यांनी उपस्थित केला.