अतिवृष्टी व पूरस्थितीवर मात करण्यासाठी शासनाच्या प्रत्येक खात्याने कृतीवर आधारित आराखडे तयार करावेत. कोणत्याही विभागाकडून हयगय झाल्यास संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकारी व कर्मचा-यांवर सक्त कारवाई येणार असल्याचा इशारा पाटणचे प्रांताधिकारी किशोर पवार यांनी दिला.
पाटण येथे मान्सूनपूर्व तयारी व आपत्कालीन व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे, कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता एम. आय. धरणे, गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांची उपस्थिती होती.
बैठकीमध्ये प्रत्येक शासकीय विभागाने आपत्कालीन परिस्थितीसाठी केलेल्या तयारीची माहिती घेण्यात आली. काही विभागाच्या प्रमुख अधिका-यांच्या गैरहजरीबाबत प्रांताधिका-यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक विभागाने आपत्ती काळात निर्माण झालेला अडथळा दूर करण्याबाबत ठोस उपाययोजना करून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी दक्ष राहण्याबाबत तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सूचना केल्या. बांधकाम विभागाची प्रभावी यंत्रणा नसेल तर पोलीस यंत्रणेला जनप्रक्षोभाला सामोरे जावे लागते. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे यांनी अडचणी मांडल्या. राज्य परिवहन, सार्वजनिक व जिल्हा परिषद बांधकाम, वीज, आरोग्य, पाटबंधारे, कृषी विभागाच्या जबाबदा-यांची जाणीव या वेळी करून देण्यात आली. २४ नियंत्रण कक्ष सुरू राहणार असून, प्रत्येक विभागाच्या संपर्क अधिका-यांचे फोन व मोबाइल चालू असणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. या वेळी प्रत्येक विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.