पूरपरिस्थीतीची पाहणी करण्यासाठी रत्नागिरीच्या दौऱ्यावर असलेले भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला. जिल्ह्यात भाजपाची ताकद वाढली आहे. सध्या भाजपात येतील असे एक-दोन नेते आहेत. भाजपामध्ये येण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. तटकरेही भाजपाच्या संपर्कात असून, तटकरे कोणते हे लवकरच स्पष्ट होईल, असे सांगत लाड यांनी तटकरेंच गुपित कायम ठेवले.

रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त स्थितीची पाहणी लाड यांनी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, पाहणी करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी दिसून आल्या. संगमेश्वरसह अन्य भागांमध्येही अनेक ठिकाणी नद्या व अन्य जलस्रोत आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. लोकसहभागातून हा गाळ काढणे शक्य आहे. त्यासाठी लोकांनीही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे गाळ उपसा करण्यासाठी नद्यांच्या परिसरातील गावांच्या समन्वयातून निधी उपलब्ध करून देऊन लोकसहभाग घेतला जाईल, असे ते म्हणाले.

यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील कोणते बडे मासे भाजपच्या गळाला लागले आहेत, असा सवाल पत्रकारांनी विचारला त्यावर लाड म्हणाले, जिल्ह्यात एक दोनजणच बडे मासे आहेत. ते संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बुडते जहाज बनला आहे. हे जहाज बुडायच्या आधीच अनेकांनी पक्षाला रामराम केला आहे. जिल्ह्यात भाजपची स्थिती आता चांगली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली नाही तरी रत्नागिरीतून निवडणूक नक्की लढवू. रत्नागिरीतच काय परंतु रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची ताकद आता वाढली आहे. त्यामुळे युती झाली नाही तरी भाजपचा कोणताही कार्यकर्ता विजयी होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार –
विधानसभा निवडणुकीनंतर आमचाच मुख्यमंत्री होणार, असे दावे शिवसेना, भाजपाकडून केले जात आहे. महायुतीतीलच दोन्ही पक्षात सुरू असलेल्या वादावर बोलताना लाड म्हणाले, देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील. त्याबाबत कोणीही संशय ठेवू नये. भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहणार आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे हे होऊ शकतात. मात्र, हे वरिष्ठ स्तरावरील विषय आहेत, असेही प्रसाद लाड म्हणाले.