News Flash

कालिदास कला मंदिरातील असुविधांवर प्रशांत दामले बरसले

शहरातील महाकवी कालिदास कला मंदिरात नाटय़ प्रयोग झाल्यानंतर कलाकारांना आजही भोजन उभे राहूनच करावे लागते. नाटय़ मंदिरात कलावंतांसाठीच्या कक्षात बसायला पुरेशी जागा नाही. स्वच्छतागृहांची अवस्थाही

| February 21, 2014 12:36 pm

शहरातील महाकवी कालिदास कला मंदिरात नाटय़ प्रयोग झाल्यानंतर कलाकारांना आजही भोजन उभे राहूनच करावे लागते. नाटय़ मंदिरात कलावंतांसाठीच्या कक्षात बसायला पुरेशी जागा नाही. स्वच्छतागृहांची अवस्थाही अतिशय बिकट आहे. खुद्द प्रेक्षकांनाही ही बाब ज्ञात आहे. प्रदीर्घ काळापासून वारंवार मागणी करूनही ही व्यवस्था सुधारण्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे सांगत अभिनेता प्रशांत दामले यांनी महापालिकेच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे गुरुवारी आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ लेखक व अभिनेते प्रा. मधुकर तोरडमल यांना वि. वा. शिरवाडकर नाटय़लेखन तर दामले यांना प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार तसेच ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांना नटश्रेष्ठ बाबुराव सावंत नाटय़कर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रा. तोरडमल यांच्या अनुपस्थितीत हा पुरस्कार उपेंद्र दाते व स्वानंद कुलकर्णी यांनी स्वीकारला. सत्काराला उत्तर देताना दामले यांनी कालिदास कला मंदिरातील अव्यवस्थेसह महापालिकेचे अक्षरश: धिंडवडे काढले.
महाकवी कालिदास कला मंदिरात झालेल्या सोहळ्यास ९४ व्या मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर, पुरस्कार निवड समितीचे प्रमुख रवींद्र कदम, परिषदेचे कार्यवाह सुनील ढगे आदी उपस्थित होते. वि. वा. शिरवाडकर नाटय़लेखन आणि प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफ ळ व सन्मानपत्र असे तर नटश्रेष्ठ बाबुराव सावंत पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रोख, शाल, श्रीफळ असे आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर दामले यांनी कला मंदिरातील एकूण व्यवस्थेबद्दल खंत व्यक्त केली. या व्यवस्थेत बदल करावा म्हणून आपण स्वत: महापालिकेकडे निवेदनाद्वारे वारंवार मागणी केली. परंतु, परिस्थितीत काहीच बदल झाला नसल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील विविध भागांतून व्यावसायिक रंगभूमीवर कलावंत येतात. पण, नाशिकमधून अनेक वर्षांत तसा एकही रंगकर्मी आला नाही. त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न होत नाही. दरवर्षी नाशिकमधून किमान एक रंगकर्मी येण्याची गरज दामले यांनी अधोरेखित केली. नव्याने व्यावसायिक रंगभूमीवर येणाऱ्या कलावंतांनी किती नाटके केली यापेक्षा नाटकांचे किती प्रयोग केले हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मोहन जोशी यांनी छोटय़ा व मोठय़ा पडद्याकडे आकर्षित होणाऱ्यांना खडे बोल सुनावले. वास्तविक या क्षेत्रात मेहनतीशिवाय पर्याय नसल्याचा सल्ला त्यांनी दिला. प्रशांत दामले यांना पद्मश्री मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे जोशी यांनी सांगितले. अरुण काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. सोहळ्यास उपस्थित राहू न शकलेल्या प्रा. तोरडमल यांनी पत्राद्वारे नाशिकमधील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 12:36 pm

Web Title: prashant damle blames nashik municipal corporation for bad condition of kalidas kala mandir
Next Stories
1 धरमतर खाडी प्रकल्पबाधित आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम
2 भुसावळच्या उस्मान व मसिरा या भावंडांना बाल वैज्ञानिक पुरस्कार
3 वीजपुरवठय़ातील व्यत्ययामुळे राज्यात पुन्हा भारनियमन
Just Now!
X