महाराष्ट्रामधील अनेकांचे आराध्य दैवत असणाऱ्या खंडेरायाची जेजुरीची ख्याती पुन्हा एकदा जगभरात झाली आहे. यासाठी कारण ठरले आहे जेजुरी गडावर सोमवती अमावस्येला टिपलेला फोटो. भंडाऱ्यात रंगलेला जेजुरीच्या मंदिराचा हा फोटो ‘२०१७ सालातील जगातील सर्वोत्कृष्ट फोटो’ ठरला आहे. जगभरातील सर्वात मोठा माहितीचा स्रोत असलेल्या विकीपिडीयाने आयोजित केलेल्या एका स्पर्धेमध्ये या फोटोने पहिला क्रमांक पटकावला आहे.

विकीपीडीयाने #WikiLovesMonuments ही थीम घेऊन जगभरातील व्यक्तींकडून त्यांच्या प्रदेशातील प्रेक्षणीय स्थळांचे फोटो मागवले होते. यामध्ये ४५ हून अधिक देशांमधील नागरिकांनी त्यांच्या देशातील सर्वोत्तम प्रेक्षणीय स्थळांचे लाखो फोटो पाठवले. केवळ भारतातूनच सात हजारांहून अधिक फोटो या स्पर्धेसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी प्रशांत खारोटे यांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी जेजुरीच्या गडावर टिपलेल्या खंडोबाच्या यात्रेच्या या फोटोला पहिले पारितोषिक मिळाले आहे. प्रशांत खारोटे हे ‘लोकमत वृत्तपत्रसमूहा’च्या नाशिक आवृत्तीचे छायाचित्रकार आहेत. त्यांच्या या चित्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या गौरवाची माहिती महाराष्ट्र राज्य सरकारअंतर्गत येणाऱ्या माहिती केंद्रच्या ट्विटर हॅण्डलवरून देण्यात आली आहे.

प्रशांत खारोटे (फोटो: प्रशांत खारोटे यांच्या फेसबुकवरून)

काय आहे ही स्पर्धा

विकी लव्ह मॉन्यूमेन्ट्स ही स्पर्धा २०१०मध्ये नेदरलॅण्डमध्ये सुरु करण्यात आली होती. स्थानिक स्तरावर सुरु झालेली ही स्पर्धा २०११ साली सर्व युरोप देशांमध्ये आणि त्यानंतर २०१२ पासून जगभरातील छायाचित्रकारांसाठी आयोजित करण्यात येत आहे.