News Flash

“राष्ट्रवादी व काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे त्यांनी लक्षात घ्यावं”

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मांडली भूमिका; राष्ट्रवादी व काँग्रेसकडून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडले जात असल्याचा सरनाईकांच्या आरोपाला मुश्रीफांनी दिलं उत्तर

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मांडली भूमिका; राष्ट्रवादी व काँग्रेसकडून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडले जात असल्याचा सरनाईकांच्या आरोपाला मुश्रीफांनी दिलं उत्तर... (संग्रहित छायाचित्र)

शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राजकीय वर्तुळात चर्चेला विषय मिळाला आहे. या पत्रावरून वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात आहे. सर्वच पक्षांतून यावर प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही महत्त्वाचं भाष्य केलं आहे. “आमदार प्रताप सरनाईक आणि परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्य सरकारवर कोणताच परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे”, असा दावा हसन मुश्रीफ यांनी सोमवारी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केला.

हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. सरनाईक यांच्या पत्रकात दोन्ही काँग्रेसकडून शिवसेनेचे पदाधिकारी फोडले जात असल्याचा आरोप केला आहे, असा प्रश्न मुश्रीफ यांना विचारण्यात आला. यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, “स्थानिक पातळीवर काही शिवसैनिक दोन्ही काँग्रेसमध्ये आले असतील. मात्र मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते फोडण्याचे प्रकार घडलेले नाही. उलट कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे सदस्य कमी असतानाही जिल्हा परिषदेत सर्वाधिक पदे दिली. गोकुळ दूध संघातही त्यांना स्थान दिले. दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतले आहे, ही बाब त्यांनी लक्षात घ्यावी. उभय काँग्रेसमध्ये मात्र एकमेकांचे कार्यकर्ते ओढून घेण्याचे सत्र कायमच सुरू असते,” असे मिश्किल भाष्य त्यांनी केले.

हेही वाचा- सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; संजय राऊत म्हणतात…

“शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या आमदारांची कामे झाली तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही”, असंही ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. याबाबत मुश्रीफ म्हणाले, “राज्यात करोनाचा संसर्ग अजूनही आहे. ७० टक्के लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत निवडणुका होणार नाही. त्यामुळे निवडणुकांवरून इशारे देण्यात अर्थ नाही”, असा टोला त्यांनी लगावला. प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भूमिकेचं स्वागत केले आहे, असा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. यावर मुश्रीफ म्हणाले, “त्यांना कधी एकदा सत्तेवर येऊ असे झाले आहे. त्यांच्यातील अस्वस्थता यातून व्यक्त झाली आहे,”असं ते म्हणाले.

सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रातील दोन महत्त्वाचे मुद्दे…

“साहेब, आमचा तुमच्या नेतृत्वावर अढळ विश्वास आहे. करोना काळात आपण प्रचंड मेहनत घेऊन कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्याचा संभाळ केला आहे. त्याबद्दल आपले खरोखर कौतुक करावे तितके कमी आहे. महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार हा वंदनीय शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेबांना दिलेला शब्द व त्यांना दिलेले वचन पूर्ण झालेले आहे. आपण या पदाला न्याय दिला आहे व देत आहात. पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरु आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे,” असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलेलं आहे.

हेही वाचा- “संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्यावं”, शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचं उद्धव ठाकरेंना पत्र!

“युद्धात लढत असताना अभिमन्यूसारखे लढण्यापेक्षा किंवा कर्णासारखे बलिदान देण्यापेक्षा, धनुर्धारी अर्जुनासारखे लढावे असे मला वाटते. त्यामुळे राज्यात आपली सत्ता असताना सुद्धा व राज्य शासनाचे किंवा इतर अन्य कुठल्याही नेत्याचे सहकार्य मिळाले नसताना कुणालाही त्रास न देता मी माझी कायदेशीर लढाई माझ्या कुटुंबासह गेले ७ महिने लढत आहे. १२ “पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली, तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी जुळवून घेतलेले बरे होईल. तर त्याचा फायदा आमच्या सारख्याकाही कार्यकर्त्यांना व शिवसेनेला भविष्यात होईल, असे मला वाटते. साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना या पत्राद्वारे कळविल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतलाय, काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद,” अशा भावना सरनाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 12:27 pm

Web Title: pratap sarnaik letter to uddhav thackeray pratap sarnaik news ncp reaction hasan mushrif bmh 90
Next Stories
1 मराठा आरक्षण : “विरोधात गेलो तर ताबडतोब विचारा, भुजबळ तुम्ही आमच्या विरुद्ध का?”
2 “आम्ही महाभारताचे योद्धे आहोत आणि माझं नाव संजय आहे”; राऊतांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3 मी इतकंच सांगेन; संभाजीराजे भोसले यांनी लोकप्रतिनिधींना केलं आवाहन
Just Now!
X