केंद्रातील यूपीए सरकारमध्ये झालेले घोटाळे मित्र पक्षाच्या मंत्र्याकडूनच झालेले असल्याने त्याचा राग काँग्रेसवर मतदार काढणार नाहीत. देवदयेने कोळसा घोटाळ्यात राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे कोठेही नाव नसल्याचे माजी मंत्री मदन पाटील यांनी सोमवारी रात्री मिरजेत झालेल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. निवडणूक प्रचाराला १५ दिवस उरले असताना मदन पाटील यांनी आपले मौनव्रत सोडून शहरातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले.
प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाही आवर्जून बोलाविण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते इलियास नायकवडी यांनी कोणत्याही स्थितीत सामान्य मतदार जातीयवादी मोदींना साथ देणार नाही, असा विश्वास व्यक्त करुन स्थिर व विकासाचे समाजकारण करणाऱ्या काँग्रेसलाच सहकार्य करावे असे आवाहन केले.
या वेळी बोलताना माजी मंत्री मदन पाटील म्हणाले, की केवळ मिरवणुका काढून अथवा हाफ चड्डीत फिरून समाजकारणाचा डांगोरा पिटणाऱ्या जातीयवादी पक्षाला उमेदवार आयात करावा लागतो. यातच त्यांचा पराभव अंतर्भूत असून सामान्य जनता या विखारी प्रचारापासून अलिप्तच राहते. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घरोघरी जाऊन प्रचार करावा असे आवाहन त्यांनी केले.
बंडखोर हाफिज धत्तुरे यांची उमेदवारी आपल्या दृष्टीने अदखलपात्र असून यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा पुनरुच्चार करून श्री. पाटील म्हणाले, की काँग्रेसच्या नेत्यांनी अंतिम क्षणापर्यंत धत्तुरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना गायब केले असल्याने संपर्क होऊ शकला नाही. अल्पसंख्याक समाज अशा गद्दाराच्या पाठीशी कधीच राहणार नाही असेही त्यांनी सांगितले.