भंडारदरा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे प्रवरा नदीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली. या पावसाळय़ात प्रवरा नदी प्रथमच तुडुंब भरून वाहू लागली आहे. शुक्रवारी दुपारपासून भंडारदरा धरणातून ७ हजार ७३६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील आढळा धरण ९९ टक्के भरले असून ते शनिवारी ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. मुळा धरणाचा पाणीसाठाही आता ९० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या ऊध्र्व जलाशयातून पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी आज पाणी सोडण्यात आले. त्यामुळे भंडारदरा धरणात आज दिवसभर पाण्याची जोरदार आवक सुरू होती. भंडारदऱ्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निळवंडे धरणाचा विसर्गही सकाळपासून हळूहळू वाढत होता. सकाळी निळवंडेच्या सांडव्यावरून ३ हजार ९९१ क्युसेक तर दुपारी ५ हजार क्युसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात पडत होते. सायंकाळी ६ वाजता निळवंडेचा विसर्ग ६ हजार ७४८ क्युसेक झाला होता. रात्री त्यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.