“भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आयपीएस अधिकार्‍यांसोबत बैठकी झाल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जातय, हा नवाब मलिक यांचा आरोप म्हणजे ‘आधी चोर्‍या-आता बहाणे’ असा प्रकार आहे.”, अशा शब्दात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे.

का तुमचे सहकारी दोन-तीन महिन्यांपासून फरार आहेत? –

तसेच, “स्वत:ला अपयश आले की केंद्रावर आरोप, करोना वाढला की सामान्य जनतेवर आरोप, खरे तर आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत. रोज सकाळी मीडियाला अजेंडा ठरवून देऊन सरकार चालत नसते, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. आरोप झाले की कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार, अशी विधाने करायची आणि नोटीस आली की बिळात लपून बसायचे. तुम्ही जर काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता? का तुमचे सहकारी दोन-तीन महिन्यांपासून फरार आहेत? त्यामुळे हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘आधी चोर्‍या-नंतर बहाणे’ अशाच वर्गवारीत मोडणारा आहे.” असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

“सरकारच्या बदनामीचे कटकारस्थान,” नवाब मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप; दरेकरांनी दिलं उत्तर

दरम्यान, नवाब मलिकांच्या आरोपाला विरोधीनेचे प्रविण दरेकर यांनी असे देखील म्हटले आहे की, “तुमच्यावर सरकार म्हणून कुठल्याही प्रकरचा विश्वास नाही. आपलं नियंत्रण नाही असं समजायचं का?, राज्यातील अधिकाऱ्यांनी सातत्याने राज्याच्या विकासाठी सरकार कोणाचेही असो त्याला समर्थन दिले आहे. व सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. पण तुमचे उद्देशचं या ठीकाणी जनहिताचे नसतील आणि व्यक्तिगत स्वार्थाचे काही निर्णय असतील तर अधिकारी अशावेळी मदत करत नसतात. तसेच जर चुकीचे होत असेल तर विरोधीपक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहिती जात असेल. मात्र ठरवून देवेंद्र फडणवीस यांना माहिती देण्याचे काही कारण नाही.” असे देरेकर म्हणाले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर देखील केली आहे टीका –

याचबरोबर बेळगावमधील भाजपाच्या विजयानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर देखील प्रवीण दरेकर यांन प्रत्युत्तर दिले आहे. “बेळगावमधील भाजपाच्या विजयानंतर काही नेते असेच प्रकार करीत आहेत. मराठी माणसाचा पराभव वगैरे बिरूद ते लावतील. पण, भाजपाच्या विजयी ३६ नगरसेवकांपैकी २३ मराठी आहेत, हे तुम्हाला कधीही सांगणार नाहीत. निव्वळ भावनात्मक विषय करून सामान्य जनतेची फसवणूक तुम्ही करू शकत नाही. निवडणूक निकालावर शंका उपस्थित करून शिवसेना आता काँग्रेसच्या अधिक जवळ गेली आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करणारी पूर्वी एकमेव गलितगात्र काँग्रेस होती. शिवसेनेलाही त्याच रांगेत जाऊन बसण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत.”, असे म्हणत दरेकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत, शिवसेनेवर देखील टीका केली आहे.