मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पदावरून पायउतार व्हाव्या लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरासह, कार्यालयांमध्ये झाडाझडती देखील सीबीआयने घेतली आहे. या कारवाईवरून आता पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षाचे नेते व भाजपा नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अनिल देशमुख यांच्यावरील सीबीआयकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत, शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आदी नेत्यांनी शंका उपस्थित करत, भाजपावर निशाणा साधला आहे. यावर आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अनिल देशमुख यांच्या घर, कार्यालयांसह विविध ठिकाणी सीबीआयची छापेमारी

“महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उच्च न्यायालयाचा आदेश स्वतःच्या सोयीने वाचला असल्याने त्यांची अशी वक्तव्य येत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत प्राथमिक चौकशीत जे आढळलं असेल, त्याप्रमाणे पुढील तपास करण्याचा अधिकार सीबीआयला आहे.” असं दरेकर म्हणाले आहेत.

तसेच, “अनिल देशमुख यांच्या संदर्भात उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की, १५ दिवसांमध्ये चौकशी पूर्ण करा आणि त्या चौकशीच्या अनुषंगाने काही आढळले, तर कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करा. तसेच, या संदर्भातील सर्व अधिकार हे सीबीआयला दिलेले आहेत. या आदेशामधील परिच्छेद क्र.८४ मध्ये स्पष्टपणे तसं नमूद आहे. याचबरोबर आदेशातील परिच्छेद ८५ मध्ये न्यायालयात कुठलीही प्रलंबित केस नसल्याने, अहवाल सादर करण्याचं न्यायालयला प्रयोजन नाही, असं देखील सांगितलं आहे. त्यामुळे प्राथमीक चौकशीत जे आढळलं असेल, त्या आधारे पुढे जाण्याचा सीबीआयला संपूर्ण अधिकार आहे. तपासात पुढे देखील जे पुरावे उपलब्ध होतील, त्यानुसार सर्वांची चौकशी होईल. तथापि याबाबत अधिक माहिती सीबीआयच देऊ शकेल. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मला वाटतं. आदेश नीटपणे वाचला नसेल किंवा सोयीनुसार वाचला असेल, म्हणून अशाप्रकारे त्यांच्या वक्तव्यांमध्ये घोळ होताना दिसतो आहे. ते चुकीची पाठराखण करताना दिसत आहेत.” असं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

“CBI च्या कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी नसावी, पण जर तसं असेल तर…” देशमुखांवरच्या कारवाईवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

या कारवाईवरून शिवसेना नेते संजय राऊत, “सीबीआयला उच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत. सीबीआय त्यानुसार काम करत असेल. यात राजकीय सूडबुद्धीचा प्रकार नसावा असं मी मानतो. पण जर तसं काही असेल, तर महाविकास आघाडीचं सरकार म्हणून आम्ही यासंदर्भात भूमिका घेऊ”, असं म्हणाले आहेत.

राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशमुखांवर धाडसत्र; जयंत पाटील यांनी सुनावलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी “या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो,” असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या भाजपावर टीकास्त्र डागलं आहे.

Anil Deshmukh : “मी तर तेव्हाच म्हणालो होतो, हा नियोजित कट आहे!”, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप!

तर, हा पूर्वनियोजित कटाचा भाग असून लवकरच दूध का दूध और पानी का पानी होईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. तसेच, अजूनही अँटिलिया प्रकरणाचा छडा का लागला नाही? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.