शिवसेनेनं भाजपापासून दूर होत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत महाविकास आघाडी करून सरकार स्थापन केलं. भाजपा नेत्यानं पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या भूमिकेवर टीका करतानाच संजय राऊत यांना युती तोंडण्यावरून सवाल केला आहे.

भाजपाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेवर टीका केली. “२५ ते ३० वर्षे शिवसेनेचं भाजपासोबत युती करुन राजकारण सुरु होते, ही त्यांची मजबुरी होती का.. हिंदुत्व व राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपाबरोबर शिवसेना होती, याचे उत्तर संजय राऊत यांना द्यावे लागेल. तसेच राष्ट्रवादी व कॉंग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार बनविणे म्हणजे युतीमध्ये लढलो असताना, नैसर्गिक युती ही भाजपा बरोबर असताना त्यांना बाजूला ठेवून महाविकास आघाडीशी सरकार बनविणे ही शिवसनेची मजबुरी आहे का..याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे. सोयीप्रमाणे बोलणे हे जनतेला पसंत पडत नाही हे संजय राऊत यांच्या अलिकडच्या काळातील वक्तव्यावरून दिसून येते,” अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

“सर्वसामान्य ग्राहक वीज बिलाने त्रासलेला आहे. नोकऱ्या नाही. कंपन्या बंद होत आहे. त्यामुळे घर कसे चालवायचे या विवंचना त्यांच्या समोर आहेत. अशा वेळेला सामान्य जनतेला वीज बिलाचा दिलासा देण्याएवजी मंत्र्यांच्या बंगल्यांना वीज बिलात सवलत देणे म्हणजे सर्वसामान्य गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे व हे सरकार मोठ्यांची पाठराखण करीत आहे,” अशी टीका दरेकर यांनी केली.

केवळ चर्चेत राहण्यासाठी वक्तव्य

“शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखतीची वेळ मागितली आहे. त्यावरुन कॉंग्रसेचे नेते संजय निरुपम यांचे वक्तव्य असावे. संजय राऊत यांनी एखाद्याची भेट घेणे, सामनामध्ये संपादकीय लिहिणे व पुन्हा त्या विषयाची बातमी होणे ही मोडस ऑपरेंडी असताना बातमीमध्ये राहिले पाहिजे व काही तरी सनसनाटी केले पाहिजे, अशा पध्दतीने जे राऊत यांच्या बाबतीत सुरु आहे, त्यावरुन संजय निरुपम यांनी वक्तव्य केले असावे. कारण काल ही बैठक फक्त सामनाच्या मुलाखतीची वेळ मागण्यासाठी होती, पण आता राजकीय भूकंप होणार. सरकार पडणार. असे होणार, अशा अर्थाने सनसनाटी निर्माण करायची असे जाणीवपुर्वक झाले आहे का. यामधून अश्या प्रकारचे वक्तव्य निरुपम यांनी केवळ चर्चेत राहण्यासाठी केले असावे,” अशी टीका दरेकर यांनी निरुपम यांच्यावर केली.