राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या विधानावरून बराच वादविवाद रंगला होता. त्याची धूळ खाली बसत असतानाच भाजपाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मुस्लिम समाजाचा बकरी ईद सणाला कुर्बानी देण्यासंदर्भात शरद पवार यांनी बैठक घेतली. त्यावर “कुर्बानीने कोरोना जाणार म्हणजे…,” अशी टोला दरेकर यानी लगावला आहे.

मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राम मंदिराच्या भूमिपूजनासंदर्भात सरकारला सल्ला दिला होता. त्यानंतर भाजपानं शरद पवार यांच्यावर टीका केली होती. आता सध्या बकरी ईदनिमित्तानं कुर्बानीचा विषयीचा विषय चर्चेत असून, शरद पवार यांनी मध्यस्थी करत बैठक घेतली होती. या बैठकीवरून प्रविण दरेकर पवारांना लक्ष्य केलं आहे. “राम मंदिर बांधून करोना जाणार का? असं विचारणारे श. प. कुर्बानीसाठी बैठक घेतात, मुख्यमंत्र्यांना मार्ग काढण्यास सूचना करतात.. कुर्बानीने कोरोना जाणार म्हणजे…,” अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.

आणखी वाचा- …तर आम्ही शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार – चंद्रकांत पाटील

आणखी वाचा- महाविकास आघाडीचा रिमोट माझ्याकडे नाही, मुख्यमंत्र्यांनी फिरायलाही हवं : शरद पवार

शरद पवार काय म्हणाले होते?

“करोना हे देशावरचं मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आलं पाहिजे. एकमेकांशी योग्य समन्वय साधून काम झालं पाहिजे. करोनाचं भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचं, हे प्राधान्यानं ठरविलं पाहिजे. परंतु, मंदिर बांधून करोनाचं संकट दूर होईल, असं काही मंडळींना वाटतं आहे. राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल, तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त करोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे.” असं सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले होते.