शिवसेना खासदार संजय राऊत हे परस्पर विरोधी भूमिका मांडून काय साधत आहेत याचं आश्चर्य वाटतं. बिहार निवडणुकीचे निकाल आले तेव्हा म्हणाले की नितीश कुमार हे मुख्यमंत्री होतील. त्यानंतर संजय राऊत म्हणाले की तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेले नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्यास तो बिहारच्या जनतेचा अपमान ठरेल. जर हाच नियम महाराष्ट्रात लागू केला तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का? असा प्रश्न आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.

बिहारबाबत शिवसेना सातत्याने भूमिका बदलताना दिसते आहे. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले तर श्रेय शिवसेनेला जाईल असं संजय राऊत म्हणाले होते. आता आज संजय राऊत यांनी उलट भूमिका घेतली आहे. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केल्यास तिथल्या जनतेचा, जनाधाराच अपमान होईल असे संजय राऊत म्हणत आहेत. शिवसेना मांडत असलेली ही भूमिका दुतोंडी नाही का? असाही प्रश्न प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.

करोना आणि लॉकडाउन यामुळे महाराष्ट्रातले व्यवसाय आणि उद्योग बंद पडले आहेत. बेरोजगारी वाढते आहे. मात्र या प्रश्नांपासून पळ काढण्याची ठाकरे सरकारची भूमिका दिसते आहे म्हणूनच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशनाचा कालावाधी ठरवू असे सांगितले जाते आहे असंही दरेकर म्हणाले. हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा प्रयत्न आणि अधिवेशनापासून पळ काढण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे असंही दरेकर म्हणाले.

करोना संकटाच्या पहिल्या दिवसापासूनच महाविकास आघाडी सरकार भांबावलं आहे. राज्य सरकारने कोणतंही नियोजन केलं नाही. सरकारने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली मात्र अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार असाही प्रश्न दरेकर यांनी विचारला. एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचं थकित वेतन मिळालं पण पुढच्या दोन महिन्यांचं नियोजन या सरकारने केलं आहे का? लोकभावना मांडण्याची ही संधी अधिवेशनात असते मात्र सरकारचे नियोजन लक्षात घेता अधिवेशन होऊच नये हीच सरकारची भूमिका असल्याचं चित्र दिसतं आहे असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.