30 November 2020

News Flash

“भाजपामध्ये मराठी माणसं नाहीत का?”; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपाचा संताप

"भगवा शिवसेनेला पेटंट दिला आहे का?"

मुंबईच्या भानगडीमध्ये भाजपाने पडू नये, मुंबई भाजपाकडे गेली तर ती गुजरातकडे नेली जाणार अशी टीका करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भाजपाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे. छत्रपतींचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा शिवसेनेला पेटंट दिलेला नाही. हा सगळ्यांचा भगवा आहे. त्याचं पावित्र्य राखण्याचं काम भाजपा करतेय असा टोला दरेकरांनी राऊतांना लगावला आहे. दरेकर पुण्यामधील एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

“दिल्लीमध्ये संजय राऊत यांनी एबीपी माझा वाहिनीला दिलेली प्रतिक्रिया मी पाहिली. ते मला पूर्णपणे आत्मविश्वास हरवलेल्या बॉडी लँगवेजमध्ये दिसले. आधी ते हातवारे करुन, मान हलवून बोलायचे. मात्र एवढ्या आत्मविश्वास हरवलेल्या स्थितीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधणारे राऊत मी यापूर्वी पाहिलेले नाही,” असं दरेकर राऊतांच्या वक्तव्याबद्दल बोलताना म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस यांनी जे मुद्दे मांडले त्या एकाही मुद्द्यावर राऊतांनी स्पष्टीकरण दिलं नाही. मेट्रो रेल्वे असो, कोस्टल रोड असो किंवा मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा असो अथवा हार्बर लिंक असो कोणत्याच मुद्द्यावर राऊतांनी भूमिका मांडली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करताना आठ ते दहा मुद्द्यांच तपशीलवार पद्धतीने मांडले मात्र त्यावर शिवसेनेने उत्तर दिलं नाही. याचं कारण म्हणजे मागील काही दिवसांपासून तुम्ही शिवसेनेची भूमिका पाहिल्यास लक्षात येईल की विकासाच्या मुद्दयावर बोलायचं नाही, राज्य सरकार काम करतयं सांगायचं नाही, केंद्र सरकार- राज्य सरकार वाद निर्माण करायचं, भावनिक वातावरण निर्माण करायचं, राज्यपाल-मुख्यमंत्री वाद निर्माण करायचं हेच शिवसेनेनं केलं आहे,” अशा शब्दांमध्ये दरेकरांनी शिवसेनेवर टीका केली.

आणखी वाचा- मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा भाजपाचा प्रयत्न; संजय राऊतांचा आरोप

“मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार असं शिवसेना सांगते. आम्ही काही मेलेल्या आईच दूध प्यायलो आहोत का? आम्ही कोण आहोत. भाजपामध्ये मराठी माणसं नाहीत का?, छत्रपतींचा भगवा शिवसेनेला पेटंट दिला आहे का? भगवा आमचा नाही, भगवा तुमचा नाही भगवा छत्रपतींचा आहे. त्या भगव्याशी तुम्ही प्रतारणा करताय. त्यामुळे त्या भगव्याला हात लावण्याचं तुम्ही काय ते ठरवा. राम मंदिराच्या बाबतीत तुमची भूमिका पाहिली आहे. ज्यांनी हिंदुत्वाला विरोध केला त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात. त्यामुळे संजय राऊत म्हणाले आहेत ते खरं आहे की भगवा कोणाच्या हातात द्यायचा हे जनताच ठरवणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जनतेनं ठरवलेलं दिसेल की हिंदुत्वाचा भगवा कोणाच्या हाती द्यायचा. कधी काळी होता तो. माननिय बाळासाहेब ठाकरे यांना हिंदू हृयसम्राट अशी उपाधी दिली होती. त्यावेळी तेज वेगळं होतं. त्यामुळं छत्रपतींचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा त्यांना पेटंट दिलेलं नाही. हा सगळ्यांचा भगवा आहे. त्याचं पावित्र राखण्याचं काम भाजपा करतेय आणि येणाऱ्या काळात जनता काय ते ठरवेल आणि राऊत यांना उत्तर देईल,” असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 1:12 pm

Web Title: pravin darekar slams shivsena leader sanjay raut over his mumbai comment scsg 91 svk 88
Next Stories
1 मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा भाजपाचा प्रयत्न; संजय राऊतांचा आरोप
2 हृदयद्रावक! विजेच्या धक्क्याने तीन सख्ख्या भावांचा मृत्यू
3 …मग तुम्ही सत्तेत का बसला आहात?; चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला सवाल
Just Now!
X