राष्ट्रीयअध्यक्ष विष्णू कोकजे यांचा निर्वाळा

नागपूर : विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया हे संघटनेचे माजी पदाधिकारी आहेत. त्यांनी पुढे काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे आणि त्यांचा विश्व हिंदू परिषदेशी कुठलाही संबंध नाही, असे मत विश्व हिंदू परिषदेचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू सदाशिव कोकजे यांनी व्यक्त केले.

विष्णू सदाशिव कोकजे यांची विश्व हिंदू परिषदेच्याअध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते बुधवारी  प्रथमच नागपुरात आले होते. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह भैय्याजी जोशी आणि इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रसार माध्यमांशी बोलताना कोगजे म्हणाले, तोगडिया यांचे उपोषण संपले असून ते देशभर प्रवास करणार असले तरी त्याचा विश्व हिंदू परिषदेशी काही संबंध नाही. त्यांनी काय करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. विश्व हिंदू परिषद त्याची दखल घेत नाही. परिषदेचा अंजेडा बदलणार नाही. तोगडिया यांना हटवण्यासाठी भाजप आणि संघाने दबाव आणला का, असे कोगजे यांना विचारले असता भाजपच्या नेत्यांना विचारा, असा प्रतिसवाल त्यांनी केला. कोणाच्याही दबावाने संघटनेत बदल केले जात नाही. तोगडिया यांच्या विरोधात परिषद कधीच नव्हती. त्यांची नाराजी असेल किंवा त्यांना पुढे काय करायचे असेल तो त्यांचा निर्णय राहील. विश्व हिंदू परिषदेमधून तोगडिया बाहेर पडल्यानंतर एकही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता त्यांच्यासोबत गेला नाही. जे कोणी गेले असतील ते पुन्हा परिषदेमध्ये परत येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी संघटनेच्या पुढील कामाबाबत चर्चा केली. देशभरात वेगवेगळ्या घटनांवरून हिंदूंना बदनाम केले जात आहे मात्र, आजपर्यंतचा इतिहास बघता त्यात सत्याचा विजय झाला आहे. यावेळी विष्णू कोकजे यांच्यासोबत कार्याध्यक्ष अशोक चौगुले, उपाध्यक्ष चंपतराय रॉय, विनायकराव देशपांडे आणि मिलिंद परांडे हे नवनिर्वाचित पदाधिकारी होते.

निकाल राम मंदिराच्या बाजूने लागेल

अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यांवर बोलताना कोकजे म्हणाले, न्यायालयाचा निकाल राम मंदिराच्या बाजूने लागेल, अशी आशा आहे. त्यामुळे मंदिर उभारणीत कुठलीही अडचण येणार नाही.