आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांची टीका

धर्मग्रंथात हिंदू नेमके कोण, याबद्दल स्पष्ट विचार मांडलेले आहेत. असे असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हिंदू कसे असावेत, यावर विवेचन करीत असतात. हिंदू धर्माची व्याख्या करणारे  भागवत हे कोण आहेत, असा सवाल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर तोगडिया यांनी ही संघटना नव्याने स्थापन केली आहे. या संघटनेने राम मंदिर उभारण्याच्या मागणीसाठी २० ऑक्टोबरला लखनौ ते अयोध्या असा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. मोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ते आज नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी संघ प्रमुख मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात भागवत यांनी मुसलमानांशिवाय हिंदुत्व नाही, असे म्हटले होते. तसेच द्वितीय संघ प्रमुख गोळवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’मध्ये काही बदल केल्याचे सांगितले होते. या दोन्ही मुद्यांवरून तोगडिया यांनी भागवत यांच्यावर हल्ला चढवला.

मुसलमानांशिवाय हिंदुत्व नाही, असे भागवत यांना वाटत असेल तर त्यांनी हे सांगावे की, गोहत्या करणाऱ्यांविना हिंदुत्व नाही, लव्ह जिहाद मानणाऱ्याविना हिंदुत्व नाही, पाकिस्तानाच्या समर्थनार्थ  काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करण्याविना हिंदुत्व नाही, १९४६ रोजी पाकिस्तानासाठी मतदान करणाऱ्यांविना हिंदुत्व नाही. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय संघचालक गोळवलकर यांची विचारधारा चुकीची आहे हे तुम्हाला ९० वर्षांनंतर कसे कळते. संघ हिंदूंना संघटित करण्यासाठी स्थापन झाला होता. त्यात मुसलमानांना स्थान नाही. संघाने काय करावे, हे भागवतांनी ठरवावे. मुस्लिमांना सोबत घेऊन चालायाचे असेल तर चालावे. या स्थितीत सोबत राहायचे की नाही ते हिंदू ठरवतील, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना तोगडिया म्हणाले की, मोदींनी सत्तेसाठी विचारधारेला तिलांजली दिली आहे. त्यांना जनतेने राम मंदिर बनवण्यासाठी कायदा व्हावा म्हणून संसदेत पाठवले, परंतु ते विदेशवाऱ्यात व्यस्त आहेत. मोदी यांनी कोटय़वधी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट भाव देण्याचे आश्वासन पाळले नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मोदींच्या सबका साथ, सबका विकास कार्यक्रमात ब्राह्मण, मराठा, पटेल यापैकी कोणालाही लाभ झालेला नाही.

राम मंदिरासाठी आदेश द्या

मोहन भागवत यांनी गेल्या आठवडय़ात हरिद्वार येथे बोलताना राम मंदिर बनले पाहिजे, असे म्हटले होते. तोगडिया यांनी भागवतांच्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले, विरोधी पक्षात असताना मागणी करायची असते. तुमची केंद्रात सत्ता आहे, तुमचे स्वयंसेवक पंतप्रधान आहेत. तेव्हा मागणी काय करता, आदेश द्या. मोदी कायदा करतील आणि मंदिर उभारतील, परंतु मागणी करीत आहात, याचाच अर्थ तुम्हाला मंदिर नको, अशी टीकाही त्यांनी केली.

राजकीय पर्याय देणार

कायदा करून राम मंदिर उभारण्यात यावे, अशी आमची पहिल्यापासून मागणी आहे. मंदिरासाठी कायदा करण्याची दोन महिने प्रतीक्षा करण्यात येईल. त्यानंतर राजकीय पर्याय उभा केला जाईल, असे सांगून ‘अब की बार हिंदूओंकी सरकार’अशी घोषणा त्यांनी  दिली.