पारनेर तालुक्यातील गारगुंडी ग्रामपंचायतीच्या दप्तरामध्ये खाडाखोड करून कोटय़वधींच्या सरकारी जमिनी बळकावणे व विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्हय़ातील ३२ पैकी ११ आरोपींचे अटकपूर्व जामीन नगरच्या सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळले.
या गुन्हय़ातील ११ आरोपींना न्यायालयाने यापूर्वी जामीन मंजूर केले आहेत. या आरोपींना पोलीस ठाण्यात नियमित हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. या आरोपींना जामीन मंजूर झाल्यानंतर आणखी ११ आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी नगरच्या न्यायालयाकडे दाखल केले. या अर्जावर बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एन. चौरे यांच्यासमोर सुनावणी होऊन न्यायालयाने सर्व आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळून लावले.
अटकपूर्व जामीन नाकारलेल्यांमध्ये दिलीप ठुबे व नामदेव फापाळे या दोन शिक्षकांचा तसेच गोवर्धन राठोड या ग्रामसेवकाचा समावेश आहे. अन्य आरोपींमध्ये नाना ठुबे, पांडुरंग झावरे, श्रीकांत गुंजाळ, ज्ञानदेव फापाळे, बालम शेख, शांताराम फापाळे, पोपट फापाळे, रेखा फापाळे यांचा समावेश आहे.
गारगुंडी ग्रामपंचायतीच्या दप्तरामध्ये खाडाखोड करून मोठय़ा प्रमाणावर शासकीय जमिनी बळकावल्याप्रकरणी प्रशांत झावरे तसेच रंगनाथ फापाळे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी होऊन दोषी आढलेल्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश देण्यात आला होता. गुन्हे दाखल होऊनही पोलीस आरोपींना अटक करण्यात टाळाळाळ करीत होते. आरोपींना अटक होऊन त्यांच्यावर कारवाईसाठी प्रशांत झावरे व रंगनाथ फापाळे यांचे प्रयत्न सुरूच होते. काही आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याचे लक्षात आल्यानंतर झावरे व फापाळे यांनी सरकारी वकील शरद लगड यांच्याकडे आणखी काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सादर केली. आरोपींचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयापुढे आल्यानंतर वकील लगड यांनी जोरदार युक्तिवाद करीत अटकपूर्व जामीन देण्यास आक्षेप नोंदविला. न्यायालयाने लगड यांचा युक्तिवाद मान्य करीत आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळले.