वीज पडून दोन जणांचा मृत्यू, सात जनावरे दगावली,अनेक घरांची पडझड
जिल्हय़ात मान्सूनपूर्व पावसाने वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. वीज कोसळून व घरांची पडझड झाल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. ७ जनावरे दगावली तसेच दोन जनावरे जखमी झाली. नगर, पाथर्डी, कर्जत, शेवगाव तालुक्यात मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी दुष्काळात टँकरचे पाणी आणून जगवलेल्या संत्र्यांच्या बागांचेही मोठे नुकसान झाले. वादळामुळे विजेचे खांब कोसळल्याने या तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झालेला होता, तो सुरळीत झालेला नव्हता. आज, रविवारी सायंकाळी पुन्हा नगर शहरात वादळासह पाऊस झाला.
पावसाने दुष्काळात होरपळलेल्या नागरिकांना काहीसा थंडाव्याचा दिलासा मिळाला आहे. ऊन व उकाडा यामुळे नागरिकांची तगमग वाढली होती, त्यावर वळवाच्या पावसाने शिडकावा केला. आज सकाळी ८ पूर्वी नोंदवला गेलेला चोवीस तासांतील पाऊस असा (आकडेवारी मिमीमध्ये)-नगर ४, शेवगाव ३, पातर्डी ३२, श्रीगोंदे ४८, कर्जत ६३, जामखेड १८.४, श्रीरामपूर २. एकूण १२.१७.
नगरमध्ये एकाचा मृत्यू, दोघे जखमी
नगर शहरात मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस कमीअधिक स्वरूपात पहाटेपर्यंत होता. काही काळ वीजपुरवठाही खंडित झाला. गेल्या काही दिवसांत वाढलेला प्रचंड उष्मा कमी झाला. आज सायंकाळी पुन्हा जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी सुरू झाल्या होत्या. काल रात्री अरणगावच्या ढमढेरेवस्तीवर येथे वीज पडून दादा शंकर ढमढेरे (५५) यांचा मृत्यू झाला तर अश्विनी संतोष ढमढेरे (२१) जखमी झाल्या. हिवरेझरे येथे घराची भिंत कोसळून श्री आनंदकर जखमी झाले. वाळकी येथेही दोन जनावरे मृत्युमुखी पडली. वादळी वाऱ्याचा तडाखा नगर तालुक्यातील कापूरवाडी, वडगाव तांदळी, खडकी, खंडाळा, वाळकी गावांना बसला. कापूरवाडीत १० ते १२ घरांची, वाळकी परिसरातील २० ते २५ घरांची पडझड झाली, संत्रा बागेतील फळे गळून पडली. विजेचे खांब उन्मळून पडल्याने अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याचा परिणाम घोसपुरी पाणी योजनेवर झाला. पंचायत समिती सभापती संदेश कार्ले यांनी पाठपुरावा केल्यानंतर तेथील वीजपुरवठा सुरळीत झाला. आज सायंकाळी विळद येथे वीज कोसळून एक गाय दगावली.
पाथर्डीत एकाचा मृत्यू
पाथर्डीतील तोंडोळी येथे विनोद शिवाजी वारंगुले (३६) यांचा मृत्यू झाला. परंतु हा मृत्यू वीज पडून की विजेचा धक्का बसून झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शेड पडून दोन शेळय़ा तसेच शेवगावमधील वडगाव येथे शेड पडून बैलाचा मृत्यू झाला. पाथर्डीतील पागोरी पिंपळगाव, चिंचपूर पांगोळी, जोगेवाडी, जवखेडे, कासार पिंपळगाव आदी ठिकाणी सुमारे ७० ते ७५ घरांची पडझड झाली. दहिगाव (शेवगाव) येथीलही काही घरांचे पत्रे उडाले.
दोन बैल दगावले
कर्जत तालुक्यात सर्वत्र रविवारी रात्री जोरदार अवकाळी पाउस झाला, त्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले आहे. मात्र पाऊस व वादळाने अनेक ठिकाणी घराचे व छपराचे पत्रे उडून नुकसान झाले, निंबोडी फाटा येथील सहय़ाद्री ग्रुप दूध संकलन केंद्राचे पत्रे उडून यंत्रसामग्रीचे मोठे नुकसान झाले, तर ढगेवस्ती येथील रोहिदास दत्तू कानगुडे यांच्या गोठय़ातील दोन बैल वीज पडून दगावले. तालुका सध्या तीव्र दुष्काळी परिस्थिती अनुभवतो आहे. दोन छावण्यांतून सुमारे ७ हजार जनावरे दाखल आहेत, तर पिण्यासाठी १ लाख नागरिकांना १०० टँकर सुरू आहेत. अशा परिस्थितीत झालेला पाऊस दिलासा देणारा ठरला.