यंदा मान्सूनचे आगमन वेळेत होण्याचे संकेत हवामान खात्याने दिलेले असतानाच शुक्रवारी दुपारी नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ात दुपारी १२ वाजता विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. नागपुरात अपघात होऊन तरुणी गंभीर जखमी झाली, तर चंद्रपूर जिल्ह्य़ात वीज पडून एक तरुण व गडचिरोली जिल्ह्य़ात ५० शेळ्या मृत्यूमुखी पडल्या.
हवामान खात्यासह तज्ज्ञांनीही विदर्भात गुरुवारपासून मुसळधार पावसाचे संकेत दिले होते. गुरुवारी रात्री पावसाच्या हलक्या सरी नागपूर, चंद्रपूर, बुलढाणा जिल्ह्य़ात बरसल्या. बुलढाणा जिल्ह्य़ात तर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस व गारपिटीने आंबा, लिंबू, संत्री, कांदा व भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच नागपूरसह अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्य़ात पावसाळी वातावरण होते, पण दुपारी १२ वाजताच्या सुमारास नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ात सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाला. नागपुरात अनेक भागात झाडे कोसळून विजेच्या तारा तुटल्या, जाहिरातींचे लोखंडी फलकही पडले. रस्त्यावर किमान गुडघाभर पाणी साचल्याने अनेक वाहने बंद पडली.  
चंद्रपूर जिल्ह्य़ात विहिरगाव येथे वीज पडून अरविंद डारलिंगे हा तरुण मृत्यूमुखी पडला.

 शेतकरी संकटात
’गेले काही दिवस निसर्गाच्या अवकृपेमुळे वातावरणात होणारे बदल आणि अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतीसोबत शेती व कृषी उत्पादनावर परिणाम झाला आहे.
’या हंगामात शेतकरी बागायतदार आर्थिक संकटात सापडला आहे. अवकाळी पावसासोबत विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाटामुळे भयभीत झालेला शेतकरी संकटात सापडला आहे.
’भात- नागली पिकावरही पावसाचा परिणाम झाल्याचे सांगण्यात येते.