दिगंबर शिंदे, सांगली

सांगली शहराची वैचारिक, मानसिक भूक भागविण्याचे काम गेली सव्वाशे वर्षे करीत असलेल्या नगर वाचनालयाच्या भेटीला आलेल्या कृष्णामाईने आठ दिवसांच्या मुक्कामात एक कोटीहून अधिक किमतीचे अक्षरलेणं आपल्या कवेत घेतल्याने कागदाचा लगदा झाला आहे. महापुराचे पाणी ओसरल्यानंतर राजवाडा चौकात असलेल्या या वाचनालयातील अनमोल पुस्तक संपदा पुराच्या पाण्याने गिळंकृत केल्याचे समोर आले.

नगरवाचनालय यंदा स्थापनेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. १८६९ मध्ये स्थापन झालेल्या या वाचनालयाने सांगलीच्या वाचकांची वाचनाची भूक भागवीत असताना अनेक व्याख्यानाचे आयोजन दर वर्षी करून वैचारिक भूमिका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यंदा वाचनालय सुवर्ण महोत्सव साजरा करीत असतानाच महापुरांच्या रूपाने कृष्णेनी हजेरी लावली.

गेल्या मंगळवारी अचानक आलेल्या महापुरात वाचनालयाच्या तळमजल्यावर असलेल्या ग्रंथालयात सुमारे सहा फूट पाण्याचे बस्तान आठ दिवस मांडले होते. यामुळे वाचनालयात असलेल्या ९० हजार पुस्तकांचा लगदा झाला असून अनेक दुर्मीळ ग्रंथसंपदा यात बाद झाली आहे. वाचनालयाने अनेक दुर्मीळ पुस्तकांचा खजिना जपून ठेवला होता, तसेच शतकाहून अधिक परंपरा सांगणाऱ्या पोथ्या, दुर्मीळ हस्तलिखिते सांभाळून ठेवण्यात आली होती.

ग्रंथालयात आयुर्वेदावर संस्कृतमध्ये भाष्य करणारी हस्तलिखितेही आहेत. ज्यांचा वापर योगगुरू रामदेव यांनाही झाला असून दुर्मीळ ग्रंथसंपदा या महापुरात खराब झाली आहे हे पाहण्याचे काम सध्या सुरू आहे. पुस्तकांच्या रॅकवरून खराब पुस्तके काढण्याचे काम सध्या सुरू असून अनेक कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे या महापुराच्या तडाख्यात सापडली आहेत, असे संस्थेचे कार्यवाह अतुल गेजरे अणि सहकार्यवाह सुहास करंदीकर यांनी सांगितले.