सांगलीतील सरकारी रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रियंका चव्हाण (वय 24) असे मृत महिलेचे नाव असून संतप्त नातेवाईकांनी प्रियंकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

प्रियंका नऊ महिन्यांची गर्भवती होती. मात्र, सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला तीन दिवसांपासून दाखल करुन घेतले नाही. या ऐवजी तिला वेगवेगळ्या वॉर्डाचे हेलपाटे मारायला लावले. मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयाबाहेर असताना प्रियंकाची प्रकृती खालावली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

प्रियंकाला सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी वेळीच रुग्णालयात दाखल करुन न घेतल्याने तिचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे. तर शवविच्छेदन तसेच फॉरेन्सिक तपासणीच्या आधारे प्रियंकाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधले जाईल आणि यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.