दिगंबर शिंदे

दिवाळीत घेतलेली ६५ हजाराची उचल फेडण्यासाठी पोटात बाळाची आबाळ करीत ती पतीसोबत राबत होती. उसतोडीचा हंगामही टाळेबंदीच्या कचाट्यात सापडला. मुकादम पैसे देण्यास नकार देऊ लागला अन् गर्भारपणाच्या नवव्या महिन्यात स्वतबरोबरच पोटातल्या बाळाला वाचविण्यासाठी त्या माउलीने घरचा रस्ता धरला. रणरणत्या उन्हात डांबरी रस्ता पाय भाजत असताना पोलिसांनी हटकले. तिची कहाणी ऐकताच पोलिसांच्या वर्दीतील माणुसकी जागली, गुरुवारी ती तिच्या पतीसह  निवाऱ्यात पोचली.

मनीषा आटपाडकर (वय २६, रा. कोळे ता .सांगोला) ही महिला पती बिरदेवसह  ऊसतोडीसाठी शिरोळच्या दत्त साखर कारखान्याच्या टोळीत कार्यरत होती. जोडीसाठी दिवाळीपूर्वी मुकादमाकडून ६५ हजाराची उचल घेतली होती. पैसे फिटत नाहीत, म्हणून गरोदर महिलेला पैसे देण्यास मुकादम नकार देत होता. त्यात प्रसूती जवळ आलेली. कोळे येथे सासू-सासऱ्याकडे दीड वर्षांची मुलगी आहे. पालात राहून बाळंतपण व्यवस्थित होईलच याची खात्री नाही. दवाखान्यात दाखवायला पैसे नाहीत. दोन वेळचे जेवणाचे वांदे. मग पालात राहून बाळाबरोबरच स्वतची आबाळ होते, म्हणून चालत कोळे या गावी निघाली होती.

मिरज वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी या महिलेला महिला कर्मचारी विद्या गुरव यांच्या ताब्यात दिले. तिला पोटभर जेवण देण्यात आले. महापालिका रुग्णालयात तिची सोनोग्राफी करण्यात आली. त्या वेळी तिच्या प्रसूतीसाठी केवळ दोन दिवसांचाच अवधी उरला असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी मत प्रदर्शित केले. महिला पोलीस गुरव यांनी तिला घरी पोहोच करण्याचा निर्णय घेतला. यासाठी खास मोटार ठरविण्यात आली.  बुधवारी रात्री दहा वाजता ही महिला आपल्या घरी सुखरूप पोहोचली. या निमित्ताने पोलिसांमधील माणुसकीही दिसून आली.