सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मुद्द्यावरून सध्या अनेक ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यात काही अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या संस्थामधील कर्मचारीही समाविष्ट आहेत. मात्र, या पुकारलेल्या संपाचा मोठा फटका सामान्य माणसांना बसल्याचे दिसत आहे. प्रामुख्याने रुग्णांना या संपामुळे हाल सोसावे लागत आहेत. अशीच एक घटना ठाणे सिव्हिल रुग्णालयात घडल्याचे वृत्त आहे.

एका वाहिनीच्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे, असे कारण देत ठाणे सिव्हिल रुग्णालयाने एका गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिल्याची घटना घडली.

सुनिता मसमारे असे या महिलेचे नाव आहे. शहापूरच्या तानसा येथील त्या रहिवासी आहेत. प्रसुती वेदना होत असूनही त्यांना शहापूरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे अद्ययावत सुविधा नसल्याने त्यांना पहाटे ठाण्यात हलविण्यात आले. परंतु कर्मचारी संप असल्याने रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे, असे कारण ठाणे सिव्हिल रुग्णालयाकडून देण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला व कळवा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला.

प्रचंड वेदना होत असतानाही त्यांना रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही. त्यामुळे नाईलाजाने त्या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, कळवा रुग्णालयात मसमारे यांची प्रसूती झाली असून त्यांची आणि बाळाची प्रकृती उत्तम असल्याचं सांगण्यात आलं.