देशाचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी परवा (शनिवार) शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असून, शिर्डीला पोलीस छावणीचेच स्वरूप आले आहे.  
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी शनिवारी लातूर येथून विमानाने नाशिक जिल्ह्य़ातील ओझर विमानतळावर येणार आहेत. तेथून दुपारी २ वाजता हेलिकॉप्टरने ते शिर्डी येथे येतील. त्यांच्या समवेत पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकुरकर हेही येणार आहेत. २ वाजून १० मिनिटांनी त्यांचे साईबाबा मंदिरात आगमन होणार आहे. साईबाबांची पाद्यपूजा त्यांच्या हस्ते होणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात ते २० मिनिटे थांबणार आहेत. या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर साईबाबा मंदिराचा परिसर व गाभारा अर्धा तास निर्मनुष्य करण्यात येण्यात असल्याने भाविकांना दर्शनासाठी ताटकळत राहावे लागेल.
मंदिराच्या गाभाऱ्यात राष्ट्रपतींसाठी रेड कार्पेट अंथरण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी शिर्डीजवळ तीन हेलिपॅड बनविण्यात आली आहेत. दर्शनानंतर राष्ट्रपती शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात येणार आहेत. त्यासाठी विश्रामगृहाचीही सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने दुरुस्ती करून ते चकाचक केले आहे. येथेच राष्ट्रपती भोजन करून विश्रांती घेणार आहेत. राष्ट्रपतींचा हा खासगी दौरा असल्याने त्यांना कुणाला भेटता येणार नाही असे समजते.