राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते रविवारी(दि.19) राजभवन येथील बंकर संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले.
राज्यपालांचे निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या जल भूषणच्या पुर्न:बांधणीच्या कोनशिलेचे अनावरणही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. या बंकरमध्ये विविध आकारांचे 13 कक्ष असून बंकरच्या सुरुवातीला 20 फूट उंच भव्य प्रवेशद्वार, किल्ल्याप्रमाणे बांधकाम तसेच तोफा आत नेण्यासाठी प्रदीर्घ उतारा (Ramp) आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्यपाल यांच्या पत्नी विनोदा राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

बंकर संग्रहालयाविषयी : सन 2016 साली राजभवन येथे आढळून आलेल्या भव्य भूमिगत बंकरमध्ये नव्याने संग्रहालय तयार करण्यात आले आहे. जवळ जवळ 15000 चौरस फूट परिसरात असलेल्या राजभवनातील विस्तीर्ण भूमिगत बंकरमध्ये संग्रहालय निर्माण करण्यात आले असून ते लवकरच सामान्य नागरिकांसाठी खुले केले जाणार आहे. त्यासाठी ऑनलाईन आरक्षण करावे लागणार आहे.भूमिगत बंकरमध्ये आभासी वास्तवतादर्शक (Virtual Reality) संग्रहालय तयार केले गेले असून त्याद्वारे लोकांना गतकाळातील बंकरच्या वापराबाबत माहिती देण्यात येणार आहे. या संग्रहालयातील अन्य कक्षामध्ये राजभवनच्या इतिहासाची झलक देखिल दाखविली जाणार आहे. अनेक दशके या बंकरची वास्तू बंदिस्त असल्यामुळे दुर्लक्षित अवस्थेत होती तसेच सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे वास्तू स्थापत्य दृष्टीने कमजोर झाली होती. ही ऐतिहासिक वास्तू राजभवनाचा वारसा असल्यामुळे तसेच त्याच्या वरील बाजूस राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेली ‘जलभूषण’ ही वास्तू उभी असल्यामुळे राज्यपालांच्या सुरक्षेशी तडजोड न करता बंकरचे संवर्धन करणे तसेच लोकांना वास्तू पाहण्याची संधी देणे आवश्यक होते.या दृष्टीने भूमिगत बंकरच्या वास्तूचे स्ट्रक्चरल ऑडीट केले गेले व नंतर तिचे बळकटीकरण करण्यात आले. त्यानंतर बंकरमध्ये आभासी वास्तवदर्शी संग्रहालय करण्याचे ठरविण्यात आले. बंकरचा शोध लागला त्यावेळी त्यातील कक्षांना ‘शेल स्टोअर’, ‘गन शेल’, काडतूस भांडार (Cartridge Store), शेल लिफ्ट, मध्यवर्ती तोफखाना कक्ष, कार्यशाळा इत्यादी नावे दिसून आली होती. बंकरमध्ये पाण्याच्या निचऱ्याची तसेच शुध्द हवा व नैसर्गिक प्रकाशाची योग्य व्यवस्था असल्याचे आढळले. बंकरमध्ये जागोजागी दिव्यांसाठी जागा (Lamp Recess) ठेवण्यात आल्या होत्या. बंकरचे संवर्धन करताना त्यातील सर्व मूळ वैशिष्टे जतन करण्याची काळजी घेण्यात आली आहे. बंकरमध्ये आभासी वास्तव दर्शविणारे कक्ष तयार करण्यात आले असून त्यातून अभ्यागतांना तोफ चालविण्याचा आभासी अनुभव घेता येईल. राज्यातील गडकिल्ल्यांचा इतिहास तसेच राजभवनाचा इतिहास देखील या ठिकाणी पाहता येणार आहे. तोफांच्या प्रतिकृती व त्रिमितीय जवानांच्या आकृती देखील याठिकाणी ठेवण्यात येणार आहेत.

जल भूषणबाबत : राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या ‘जल भूषण’ या वास्तूला 200 वर्षांचा इतिहास आहे. गव्हर्नर माउंटस्टूअर्ट एलफिन्स्टन यांनी बांधलेली ‘प्रेटी कॉटेज’ याच ठिकाणी उभी असल्याचे इतिहासात नमूद करण्यात आले आहे. सन 1885 साली मलबार हिल येथील निवासस्थानाचे ठिकाणी ‘गव्हर्न्मेंट हाउस’ स्थलांतरित झाल्यापासून या वास्तूमध्ये ब्रिटीश गव्हर्नर यांचे व स्वातंत्र्यानंतर राज्यपालांचे निवासस्थान राहिले आहे. अनेकदा बांधली गेलेली ही वास्तू निवासासाठी असुरक्षित असल्याचे आढळून आल्यामुळे या ठिकाणी नवी वास्तू बांधण्याचे ठरविण्यात आले.प्रस्तावित ‘जल भूषण’ वास्तूमध्ये जुन्या वास्तूमधील ठळक वैशिष्ट्ये जतन केली जाणार आहेत.