राष्ट्रपती रामनाथ कोविंद १ ऑक्टोबरला शिर्डी विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. अहमदनगरमधील शिर्डी विमानतळाचा व्यावसायिक वापर करण्यास हवाई वाहतूक महासंचालनालने (डीजीसीए) मागील आठवड्यात परवानगी दिली. हे विमानतळ मुंबईपासून २३८ किलोमीटर अंतरावर आहे. १ ऑक्टोबरपासून साईबाबा संस्थान ट्रस्टकडून साईबाबा समाधी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचे उद्घाटन केले जाणार आहे.

‘महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी’ने (एमएडीसी) शिर्डीतील विमानतळाची उभारणी केली आहे. या विमानतळाची मालकीदेखील याच कंपनीकडे राहणार आहे. ‘मुंबई-शिर्डी’ विमानसेवेची उड्डाण चाचणी आज पार होणार आहे. शिर्डीसाठी झेपावणाऱ्या विमानातून अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे उड्डाण करणार आहेत. ‘आम्ही ‘एटीआर ७२’ विमानाच्या मदतीने उड्डाण चाचणी घेणार आहोत. यानंतर १ ऑक्टोबरला या विमानतळाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल,’ अशी माहिती ‘एमएडीसी’चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकनी यांनी दिली.

‘शिर्डीतील विमानतळावरुन एअर इंडियाचा भाग असलेल्या ‘अलायन्स एअरवेज’चे विमान उद्घाटनानंतरचे पहिले उड्डाण करेल. या विमानतळाचा व्यावसायिक वापर २ ऑक्टोबरपासून सुरु होईल,’ असेही त्यांनी सांगितले. या विमानतळावरुन भविष्यात रात्रीच्या वेळीही विमानाचे उड्डाण करण्याची योजना आहे. नवी दिल्ली, हैदराबाद विमानतळांसोबत शिर्डी विमानतळ जोडले जाणार आहे. शिर्डीत दररोज ८० हजार साईभक्तांची ये-जा सुरु असते. या विमानतळामुळे साईभक्तांच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

सध्या या विमानतळावरुन सेवा देण्यासाठी ‘अलायन्स एअर’ आणि हैदराबादस्थित ‘ट्रूजेट’ने उत्सुकता दर्शवली आहे. यासाठी या दोन्ही कंपन्यांनी अर्जही दाखल केले आहेत. ‘अलायन्स एअर’ ‘मुंबई-शिर्डी’ मार्गावर हवाई सेवा देणार आहे, तर ‘ट्रूजेट’कडून ‘हैदराबाद-शिर्डी’ मार्गावर सेवा दिली जाणार आहे. याशिवाय या विमानतळावरुन सेवा सुरु करण्यासाठी ‘इंडिगो’नेदेखील अर्ज केला आहे. २१ सप्टेंबरला ‘डीजीसीए’ने शिर्डी विमानतळाला व्यावसायिक परवाना दिला आहे.