सुशीलकुमार शिंदे यांचा रोख राष्ट्रवादीकडे

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राज्यातील काँग्रेसची मते अजिबात फुटली नाहीत. मात्र आघाडीतील अन्य पक्षाची मते फुटली असतील, असे मत राष्ट्रवादीचा थेट नामोल्लेख टाळत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे व्यक्त केले.

नुकतीच राष्ट्रपतिपदाची निवडणूक झाली. यात राज्यात विरोधकांची काही मते फुटल्याचे दिसून आले. शेकाप, माकप अशा छोटय़ा-छोटय़ा पक्षांची मते फुटून भाजपला पडल्याचे गृहीत धरले तरीसुध्दा विरोधकांची ही मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. ही फुटलेली मते काँग्रेस व राष्ट्रवादीची असू शकतात. यासंदर्भात सुशीलकुमार शिंदे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी काँग्रेसची मते फुटली नसल्याचा दावा केला. काँग्रेसची मते फुटली नाहीत तर मग राष्ट्रवादीची मते फुटली का, यावर भाष्य करण्याचे शिंदे यांनी टाळले. मात्र अनेक ठिकाणी काँग्रेसची आघाडी आहे. त्यातील मते फुटू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपलाच अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याचा दावा करताना, आतापर्यंत झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर सर्वात कमी मतांची टक्केवारी भाजपला मिळाल्याचे दिसून येते, असेही शिंदे यांनी सांगितले

शनिवारी सोलापुरात आल्यानंतर शिंदे यांनी काँग्रेस भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहत असल्याच्या पाश्र्वभूमीवर शिंदे यांना तेथील पक्षाच्या जबाबदारीविषयी विचारले असता पक्षाने आपणास अद्यापि कोणती विचारणा केली नाही. मात्र पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायला आपण तयार आहोत, असे त्यांनी नमूद केले. शिंदे यानी यापूर्वी हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे प्रभारीपद सांभाळले होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. त्यावर बोलताना शिंदे यांनी भाजपच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी महिना उलटून गेला तरी त्याची अंमलबाजवणी झाली नाही. त्याबाबतचे आदेशही खालच्या स्तरावर पोहोचले नाहीत. केवळ घोषणा होऊन उपयोगाचे नाही. शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा. त्याबाबत भाजपची भूमिका प्रामाणिकपणाची दिसत नाही, अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

सोलापूर महापालिकेतही सत्ता मिळूनही भाजपला छाप पाडता येईना, अशी स्थिती दिसून येते. त्यावर भाष्य करताना महापालिकेत सत्ता मिळून चार महिने होऊन गेले तरी भाजपला वेळेवर अर्थसंकल्प मांडता येत नाही. आम्ही समर्थन दिले म्हणून अर्थसंकल्प मांडता आला.

शहरातील नागरी समस्यांकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. आम्ही सत्तेवर असताना हेच भाजपवाले आरडाओरड करायचे. आता शहराला दरुगधीयुक्त पाणीपुरवठा होतो. गटारींच्या प्रश्नावर बोलायला सत्ताधारी बोलायला तयार नाहीत, अशा शब्दांत शिंदे यांनी भाजपचा समाचार घेतला.