कोकणातील गिरणी कामगारांना घरे मुंबईतच मिळाली पाहिजेत, म्हणून कोकणातील आमदारांना एकत्रित घेऊन येत्या अधिवेशन काळात आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागणी करणार आहोत. सत्तेत असलो तरी गिरणी कामगारांच्या हक्कासाठी निश्चितच दबावगट निर्माण केला जाईल, असे आमदार दीपक केसरकर यांनी जाहीर केले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई व सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघाच्या वतीने गिरणी कामगारांच्या मेळाव्यात आ. दीपक केसरकर बोलत होते. यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, आंबेडकर इन्स्टिटय़ूट संचालक जी. बी. गावडे, जिल्हाध्यक्ष दिनकर मसगे, नगराध्यक्ष बबनराव साळगांवकर, सुनील बोरकर, साई निकम, विष्णू परब, सुभाष शिंदे, रमेश कानडे, एस. टी. सावंत, रवींद्र सुर्वे व पदाधिकारी उपस्थित होते.
गोवा राज्यातील खाण कामगारांच्या निर्माण झालेल्या ज्वलंत प्रश्नी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी लक्ष घातले असून, तेथे मी गेल्याने कार्यालयास उपस्थित राहण्यास उशीर झाल्याचे सांगत आ. केसरकर म्हणाले, खऱ्या अर्थाने गिरणी कामगारच मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता. गिरणी व कामगारांचा मुंबईची अर्थव्यवस्था निर्माण करण्यात वाटा होता. मुंबई उत्पादन करणारी नगरी होती असे आ. केसरकर म्हणाले.
कोकणातील मोठा वर्ग गिरणी कामगार म्हणून होता. त्या काळात मनिऑर्डर मोठय़ा प्रमाणात येत होती, तसेच गिरणी कामगारांकडे  इकडील अनेकांनी राहून शिक्षण घेतले आहे. त्यामुळे कोकणचा आधारस्तंभ गिरणी कामगाराला आधार देण्यासाठी कोकणानेच उभे राहायला पाहिजे, असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.
मुंबईची उभारणी करणाऱ्या गिरणी कामगाराला मुंबईतच हक्काचे घर मिळाले पाहिजे, म्हणून मी प्रयत्न करतानाच कोकणातील आमदारांचा दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही आ. केसरकर यांनी देऊन कामगार, त्यांचे वारसांचे घर, रेशनकार्ड, रोजगार अशा विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधणार आहे असे ते म्हणाले. या प्रश्नावर दबावगट निर्माण केला जाईल, अशी त्यांनी ग्वाही दिली.