अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा आणि या विषयावर तोडगा काढावा असा सूर सध्या उमटत आहे. मंत्री स्तरा व सभासदांमधूनही प्रसाद सुर्वे यांच्यावर हा राजीनामा मागे घेण्यासाठी दबाव येत आहे.
चित्रपट महामंडळ सभेतील वादानंतर सुर्वे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोल्हापूर, पुणे, मुंबई व सर्व राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.  ज्यांचा मराठी चित्रपटसृष्टीशी काडीचाही संबंध नाही अशा लोकांनी कुटील पद्धतीने घाणेरडे राजकारण करून सुर्वे यांना राजीनामा द्यायला भाग पाडले, असा सूर महामंडळाशी संबंधितांनी व्यक्त केला. ज्यांनी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला. अडीचशेच्यावर चित्रपटात भूमिका केल्या त्या अलका कुबल, प्रिया बेर्डे, विजय पाटकरसारख्या दिग्गज कलावंतांना ‘ताटाखालचे मांजर’ असे संबोधण्यापर्यंत मजल गेली. त्या सर्वानी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांनी व्यक्त केल्या. सुर्वे यांच्या पाठपुराव्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे, फौजिया खान, आमदार मकरंद पाटील यांनी कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या कामाची अर्थसंकल्पात तरतूद केल्याचेही या कलावंतांनी सांगितले.  सुर्वे म्हणाले, राजीनामा मागे घेण्यासाठी कलावंत, वरिष्ठ मंत्र्यांकडून दबाव येत आहे. पण मी तो मागे घेणार नाही. साडेसात लाख रुपयांच्या निधी संदर्भात, आणि राजीनाम्याविषयी नवीन अध्यक्षांच्या निवडीनंतरच (दि. २७ ) मी बोलेन.