चक्रीवादळाचा तडखा बसला असला, तरी मोठी जिवीत हानी रोखण्यात रायगड जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. दोन दिवसांत केलेल्या आपत्ती व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे जिवीतहानी रोखणे शक्य झाले आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाचे चक्रीवादळात रुपांतर होईल आणि हे वादळ रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर धडकेल असा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दोन दिवसांपुर्वीच दिला होता. या इशाऱ्यांची गंभीर दखल घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वयित केल्या होत्या. शुन्य जिवीतहानीचे उद्दीष्ट ठेऊन प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या होत्या.

वादळाचा तडाखा चार तालुक्यातील ६० गावांना प्रामुख्याने बसेल असा अंदाज होता. त्यामुळे या गावांमधील कच्च्या घरात राहणाऱ्या सर्वाना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करणे आवश्यक होते. २४ तासांत तब्बल १३ हजार ५४१ जणांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आले. यात अलिबाग तालुक्यातील ४ हजार ४०७, पेणमधील ८७, मुरुडमधील २ हजार ४०७, उरणमधील १ हजार ५१२, श्रीवर्धनमधील २ हजार ५५३, म्हसळ्यातील २३९ लोकांचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाने घेतलेली ही खबरदारी उपयुक्त ठरली.

गावागावातील लोकांना शाळा, सभागृह आणि ग्रामपंचायत कार्यालये, मंगलकार्यालयात स्थलांतरीत करण्यात आले होते. करोनाच्या पार्श्वभुमीवर प्रत्येक तालुक्यात विलगीकरण केंद्रांची प्रशासनाने उभारणी केली होती. ही विलगीकरण केंद्र्रे जंतुनाशक फवारणी करून ग्रामस्थांच्या स्थलांतरणासाठी वापरण्यात आली.

जिल्हास्तर, तालुकास्तर आणि गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वयीत करण्यात आल्या. गावागावात दवंडय़ा देऊन नागरिकांना घरीच राहण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. तर चोवीस तासांसाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. या सर्वाचा फायदा आपत्ती व्यवस्थापनात झाला. मोठी जिवीत हानी रोखण्यात प्रशासकीय यंत्रणा यशस्वी झाल्या. संपर्क यंत्रणा खंडीत होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात हॅम रेडीओ आणि वायरलेस यंत्रणा कार्यान्वयीत करण्यात आली होती. याचा फायदाही संपर्क रोखण्यासाठी झाला. अलिबाग तालुक्यातील उमटे येथील घटनेचा अपवाद सोडला. तर इतर कुठेही जिवीत हानी झाली नाही.

जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती नवी नाही. यापुर्वीही जिल्ह्यात अनेक वेळा वादळे, महापूर आणि भुस्खलनासारख्या घटना घडल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती टाळणे शक्य नसले तरी योग्य नियोजन केले तर त्यामुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते हे रायगड जिल्हा प्रशासनाने दाखवून दिले आहे.

‘शुन्य जिवीतहानीचे लक्ष्य आम्ही डोळ्यापुढे ठेवले होते. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या होत्या. त्या बऱ्याच प्रमाणात उपयुक्त ठरल्या, वादळामुळे संभाव्य जिवीत हानी रोखण्यात यश आले.’

–   निधी चौधरी, जिल्हाधिकारी रायगड.